नवी दिल्ली वृत्तसंस्था । पुलवामा येथील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याला बदला घेण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य असल्याचे प्रतिपादन केले आहे.
कालच्या दहशतवादी हल्ल्यानंतर आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. यात ते म्हणाले की, ही वेळ राजकारणाची नाही. दहशतवाद्यांनी केलेल्या कृत्याचा धडा त्यांना शिकवण्यात येईल. आणि याचा बदला घेण्यासाठी सैन्यदलांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आल्याची माहितीदेखील पंतप्रधानांनी दिली. याप्रसंगी मोदींनी पाकच्या दुटप्पी भूमिकेवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, आपला शेजारी देश स्वत: बरबादीच्या मार्गावर असतांना भारतात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या हल्ल्यानंतर देशातील जनतेमध्ये तीव्र आक्रोश असून याची आपल्याला जाणीव असल्याचे मोदी म्हणाले. जगभरातून अनेक देशांनी या हल्ल्याचा निषेध करून भारतासोबत उभे राहण्याची घोषणा केल्याचे सांगून या देशांचे पंतप्रधानांनी आभार मानले.