मुंबई (वृत्तसंस्था) वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी जवळपास 50 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
सोशल मिडीयावर शरजील इमामच्या सुटकेची मागणी करणारे पोस्टर शेअर करण्यात आले होते. यामध्ये टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्समधील (TISS)एका विद्यार्थीनीचाही समावेश आहे. उर्वशी चुडावाला असे या विद्यार्थीनीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 50 जणावर भारतीय दंड संहिता (IPC) कलम 124 A, 153 B, 34 आणि 505 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी (1 फेब्रुवारी) मुंबईतील आझाद मैदानात क्विर प्राईड मार्च नावाने एलजीबीतीक़्यु समुहाने एक रॅली आयोजित केली होती. यात एका गटाने शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसांनी या गटाशी संबंधित लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.