मुक्ताईनगर प्रतिनिधी । जुने मुक्ताई मंदिरासमोरील नदीपात्रात घाटावर साफसफाई करताना एका युवकाला मासे पकडण्याच्या तुटलेला जाळ्यामध्ये एक मांडूळ जातीचा दुतोंडी साप आढळून आला त्याने लागलीच दोन मित्रांच्या मदतीने त्याला मुक्त केले.
तीर्थक्षेत्र श्री संत मुक्ताई मंदिर जुने कोथळी येथील नदीपात्राच्या घाटावर विजय भोई हा युवक स्विमिंग पूल व बोटिंग देखरेखीचे काम करतो. विजय तिथे साफसफाई करीत होता. त्याला अचानक एका मासे पकडण्याच्या जाळ्यात मांडूळ जातीचा दुतोंडी साप आढळून आला. त्याने लागलीच गावातील दोन मित्रांना भ्रमणध्वनीवरून याबाबत माहिती दिली व घटनास्थळी बोलावून घेतले. मित्रांनी त्याला सहकार्य करीत मासे पकडण्याच्या जाळ्यातून मांडूळ सापाला बाहेर काढले व लागलीच मुक्ताईनगर येथील वनविभागाच्या कार्यालयात सदर साप ते घेऊन गेले. वन विभागाच्या कर्मचार्यांनी तात्काळ सर्पमित्र शेखर पाटील व पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून घेतले सापाला किरकोळ जखम झाली असल्याने वैद्यकीय अधिकार्यांनी त्यावर प्रथमोपचार केला. वनपाल डी. एम. कोळी यांनी हा साप सर्वांसमक्ष जंगलात सोडला. विजय व त्यांचे मित्र या युवकांमुळे मांडूळ जातीच्या सापाला जीवदान मिळाले.
कुर्हा भागातील काही तस्करांकडून याच मांडूळ जातीच्या सापाची तस्करी लाखोंच्या घरात तस्करी केले जाते व काही ठिकाणी या व्यवहारासाठी आलेल्या लोकांची लूटमारही केली जाते. या घटना सर्वश्रुत असताना युवकांनी दाखवलेला प्रामाणिकपणा हा कौतुकाचा विषय ठरला आहे.