मुंबई प्रतिनिधी । विरल आचार्य नंतर आता मायकेल पात्रा हे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मायकेल पात्रा रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीचे सदस्य आहेत.
आयआयटी मुंबईमधून अर्थशास्त्रात पीएचडी केलेले पात्रा हे २००५ पासून रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण विभागात काम करत आहेत. आंतररराष्ट्रीय पातळीवरील वित्त, पैसा आणि धोरणे याविषयी आर्थिक विश्लेषण आणि धोरणे विभागाचे ते सल्लागार राहिले आहेत. १९८५ मध्ये ते रिझर्व्ह बँकेत रुजू झाले. त्यांनी हावर्ड विद्यापीठात आर्थिक स्थैर्य या विषयावर संशोधनात्मक लिखाण केले. विकासाला चालना देण्यासाठी पतधोरणात व्याजदर कपातीचे पात्रा यांनी समर्थन केले आहे. विद्यमान डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी राजीनामा दिला असून येत्या २३ जुलै रोजी आचार्य यांच्या जागी मायकेल पात्रा पदभार स्वीकारतील. ते पुढील तीन वर्षे डेप्युटी गव्हर्नरपदी राहतील. रिझर्व्ह बँकेत विविध विभागात तब्बल ३५ वर्षे काम करण्याचा मायकेल पात्रा यांना अनुभव आहे.