जळगाव (प्रतिनिधी) निर्धार योग प्रबोधिनीच्यावतीने रथसप्तमीनिमित्त सुर्यनारायणाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माघ शुद्ध सप्तमी म्हणजेच ‘रथसप्तमी’ला विवेकानंद प्रतिष्ठान संचलित निवासी विभागातील ३०० विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे धडे देण्यात आले. कार्यक्रमात ‘सूर्यनमस्काराचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्व’ याविषयी निर्धार योग प्रबोधिनीचे सचिव कृणाल महाजन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर निर्धारचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, निवासी विभागाचे प्रमुख शशिकांत पाटील आदी उपस्थित होते. ‘निर्धार’चे ज्येष्ठ योगशिक्षक जयसिंगराव वाघ आणि प्रकाश राठोड यांनी विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक करवून घेतले.
आपल्या व्याख्यानात कृणाल महाजन यांनी सुर्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यानिसंगीतले की, खरे हिंदुत्व म्हणजे निसर्गाप्रती कृतज्ञता होय. म्हणूनच हिंदू धर्मात निसर्गातील झाड, पशु, पक्षी, नदी यांच्या जयंत्या किंवा प्रकट दिवस साजरा करण्याची प्रथा आहे. सूर्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते. कारण सूर्यकिरणाशिवाय पृथ्वीचे अस्तित्वच नाहीसे होऊ शकते. वेदांमध्ये व पौराणिक ग्रंथांमध्ये सूर्याची उपासना करण्याबद्दल अनेक संदर्भ सापडतात. उगवत्या व मावळत्या सूर्याला दंडवत घालणे हे सूर्यनमस्कारांचे प्रथम उद्दिष्ट आहे. जे साधक दररोज सूर्यनमस्कार करतील, त्यांना सहस्रजन्म दारिद्र्य येत नाही, तो साधक आरोग्य संपन्न जीवन जगतो. सूर्यनमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे. सर्व यौगिक अभ्यासासाठी सूर्योदयाची वेळ सर्वोत्तम मानली गेली आहे. उघड्यावर हवेशीर जागेवर रिकाम्या पोटी सूर्यनमस्कार घालावेत असा उल्लेख ग्रंथांमध्ये आढळतो. मन शांत आणि प्रसन्न असल्यावर सर्व योगाभ्यासाचा आपणावर विशेष परिणाम होत असतो. सकाळी सूर्योदयानंतर, श्वासाचे नियमन करून एका विशिष्ट क्रमाने १० किंवा १२ योगासने करणे याला सूर्यनमस्कार म्हणतात. सूर्यनमस्कार किंवा साष्टांग नमस्कार ही तथाकथित सूर्य-उपासनाच आहे. हिच्यामुळे सर्वांगसुंदर व्यायाम होतोच पण आत्मिक, मानसिक, व शारीरिक सामर्थ्यही प्राप्त होते. सूर्यनमस्कारात आरोग्य, दीर्घायुष्य, कार्यक्षमता हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवायचे असते. आयुष्य, बल आणि बुद्धिचा विकास होतो. मस्तक, मान, हात, पाय, छाती, पोट, कंबरेचे स्नायू, मेरुदंड, पायाची बोटे, गुढगे, सर्व सांधे यांना व्यायाम घडतो. तसेच पोटाचे जडत्व, अनावश्यक वाढलेला मेद, ओटीपोटातील चरबी, थायरॉईडसारखे विकार, लहान मुलांचे फिरलेले हातपाय व हाडांचे काही दोष, घशातील विकार नाहीसे होतात. क्षयापासून संरक्षण मिळते, मनोबलाचा विकास होतो. शरीरात शुद्ध रक्ताचा सारख्या प्रमाणात संचार होतो. आदी फायदे केवळ सूर्यनमस्काराच्या दैनंदिन साधनेमुळे साध्य होतात.