

सोलापूर, वृत्तसंस्था | नववर्ष २०२० मध्ये संपूर्ण वर्षांत एकूण सहा ग्रहणे होणार आहेत. यामध्ये दोन सूर्यग्रहणे आणि चार चंद्रग्रहणांचा समावेश आहे. या सर्व चंद्रग्रहणात चंद्र पूर्णपणे झाकला जाणार नाही आणि चंद्राची काळी छाया पृथ्वीवरही पडणार नाही. या वर्षातील पहिले चंद्रग्रहण जानेवारी महिन्यात होणार आहे. जाणून घेऊया या वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाचा वेध, वेळ आणि समाप्तीविषयीची सविस्तर माहिती.

१० जानेवारी २०२० रोजी पौष पौर्णिमेच्या दिवशी वर्षातले पहिले चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण एकूण चार तास पाच मिनिटे सुरू राहील. ग्रहण सुरू होण्याची वेळ १० जानेवारी रोजी रात्री ११.३७ मिनिटांची असून, मध्यरात्री ०२.४२ मिनिटांनी ग्रहण समाप्त होईल.
हे चंद्रग्रहण छायाकल्प प्रकारातील असून, भारतात दिसणार आहे. ग्रहण कालावधीत चंद्र धूरकट दिसेल. भारतासह युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अन्य आशियाई देशात हे चंद्रग्रहण दिसू शकेल. छायाकल्प चंद्रग्रहण शास्त्रानुसार पूर्ण ग्रहणासारखे नसते. पौर्णिमेला केले जाणारी पूजा-अर्चा नियमित पद्धतीने केली जाऊ शकते, असे पंचांगकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे. चंद्रग्रहणाचे वेध १० जानेवारी रोजी दुपारी १.३९ मिनिटांनी लागणार असून, मध्यरात्री ग्रहण सूटल्यानंतर म्हणजेच २.४० मिनिटांनी वेध समाप्त होतील.
चंद्रग्रहणाचे वेळापत्रकः
ग्रहण स्पर्श – रात्री १०.३९ मिनिटे
ग्रहण मध्य – रात्री १२.३९ मिनिटे
ग्रहण मोक्ष – मध्यरात्री २.४० मिनिटे
ग्रहणाचा एकूण अवधी – सुमारे ४ तास
वर्ष २०२० मधील आगामी ग्रहणेः
१० जानेवारी – चंद्रग्रहण
५ जून – चंद्रग्रहण
२१ जून – सूर्यग्रहण
५ जुलै – चंद्रग्रहण
३० नोव्हेंबर – चंद्रग्रहण
१४ डिसेंबर – सूर्यग्रहण
खगोल शास्त्रानुसार चंद्रग्रहण ही निव्वळ खगोलीय घटना आहे. परिक्रमा पूर्ण केल्यानंतर पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्यामध्ये येते तेव्हा चंद्र झाकला जातो आणि चंद्रग्रहण होते. जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या दरम्यान पृथ्वी येते तेव्हा सूर्याची किरणे चंद्रापर्यंत पोहोचत नाही. त्यावेळी चंद्रग्रहण लागले, असे मानले जाते. पृथ्वीच्या चोहोबाजूला फिरणारा चंद्र हा पृथ्वीचा एक उपग्रह आहे. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी सूर्य आणि पौर्णिमेच्या दिवशी चंद्र झाकला जातो, अशी धार्मिक मान्यता आहे. ग्रहणाच्या दिवशी खाण्या-पिण्यापासून ते पूजा-अर्चा करण्यापर्यंतची अनेक बंधने धार्मिक मान्यतेनुसार टाकण्यात आली आहेत.


