साक्षरतेतूनच सक्षमीकरण व आर्थिक विकास साधणे शक्य – प्रांताधिकारी राजेंद्र कचरे

pachora news

जळगाव, प्रतिनिधी । महिलांनी स्वत:ला सक्षम, सुरक्षित आणि आर्थिक स्वयंभु सिध्द करण्यासाठी शिक्षणाची कास धरणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन पाचोरा उप विभागाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालय आणि एम.एम. साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सुरक्षा व सायबर कायदे या विषयावर माध्यम प्रतिनिधींसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरुन श्री. कचरे बोलत होते.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
याप्रसंगी व्यासपीठावर उप विभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकाडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अनिल शिंदे, पाचोरा तालुका शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी, प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील आदिसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्री. कचरे म्हणाले की, भारतासारख्या लोकशाही प्रधान देशात स्त्री-पुरुष समानता मानली जाते. महिलांनी समाजात वावरतांना जशी सजकता आणि सतर्कता बाळगणे आवश्यक आहे तसेच भारतीय संस्कार व संस्कृतीही जोपासणे आवश्यक आहे. महिला विशेष करून विद्यार्थीनिंनी समाज माध्यमांचा वापर करताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. समाज माध्यमे हे एक दुधारी हत्यार असल्याने त्याचा वापर करताना आपल्याला त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

डीवायएसी कातकाडे यांचे सायबरवर मार्गदर्शन
उप विभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकाडे यांनी कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, महिलांनी समाजात वावरताना निर्धास्त रहावे. शासन आणि पोलिस प्रशासन सदैव्य आपल्या संरक्षणासाठी तत्पर असते. त्यासाठी महिलांनी विशेषत: विद्यार्थीनिनी संस्कृती, संस्कार, आदर आणि आदर्श अशा नितीमुल्यांचा जीवनात अवलंब केल्यास आपल्या पालकांसोबतच आपले गुरूजन आणि समाजाची मान नेहमी उंचावत ठेवू शकाल. मोबाईलचा वापर करताना माझ्या विद्यार्थी बहिणींनी स्वत:ला राजहंस बनवावे. महिलांनी आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी निर्भिडपणे पुढे येवून तक्रारी नोंदवावी. कुटुंबात महिलांचा आदर आणि त्यांच्याविषयी समानतेची भावना ठेवल्यास हुंडाबळींसारखे गुन्हे घडणार नाहीत. यावेळी त्यांनी पोलीस दलामार्फत राबविण्यात येत असलेल्या दामिनी पथक, निर्भया पथक, हेल्पलाईन, पोलीस ॲप, टोल फ्री क्रमांक, सायबर कायदे आदिंबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने आणि महाविद्यालयाला 50 वर्षे पुर्ण झाल्याचे औचित्य साधून महिला सुरक्षा आणि सायबर कायदे या विषयावर होत असलेली कार्यशाळा म्हणजे एक दुग्धशर्करा योग आहे. महिला आज सर्वच क्षेत्रात अग्रेसर असून त्यांनी त्यांचा प्रगतीचा आलेख सदैव उंचावत ठेवावा. अशा शुभेच्छा देवून महिला स्वावलंबी बनल्यास त्यांचे कुटुंबाबरोबरच समाजातील महत्व अबाधित राहिल.

विविध विषयांवर चर्चा
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी राज्य शासन, पोलिस प्रशासन महिलांसाठी राबवित असलेल्या योजनांची माहिती देवून महिलांनी स्वत:ला अबला न समजता आता त्या सर्व दृष्टीने सबला झाल्याने कुटुंबाबरोबरच समाजाचेही नेतृत्व करण्यास सक्षम असल्याचे सांगितले. प्राध्यापिका श्रीमती कल्पना जंगम, सुनिता गुंजाळ, शैलजा पाटील यांनी महिला सक्षमीकरण, महिलांचे हक्क, समाजात वावरताना घ्यावयाची काळजी या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच इतिहासाचे अनेक दाखले देवून महिला आज कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत, महिलांनी स्वत:ला कमी समजू नये, तुम्ही क्रांतीज्योती सावित्रीच्या लेकी असून महिला या तारक, मारक व प्रेरक असल्याचेही सांगितले.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते क्रांतीजोती सावित्रीबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच दीपप्रज्वलन करुन कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्राध्यापिका वैशाली पाटील यांनी तर आभार प्रा. वासंती चव्हाण यांनी मानले. या कार्यशाळेस वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्राध्यापक वृंद, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, विद्यार्थी-विद्यार्थीनी विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे विनोद पाटील, रामकृष्ण कोळी, भूषण सोनवणे यांच्यासह महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

Protected Content