कोल्हापूर वृत्तसंस्था । कर्नाटक नवनिर्माण सेनेचे भीमाशंकर पाटील याच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर बेळगावमधील मराठी भाषिक आणि शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यानंतर शिवसैनिकांनी भीमाशंकर यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढल्यानंतर संतप्त झालेल्या कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बेळगावातील दुकानांवर असलेले मराठी फलक तोडून टाकले. परिणामी आज सकाळपासून महाराष्ट्रातून एकही बस कर्नाटकात गेली नसून, कर्नाटकातूनही एकही बस राज्यात दाखल झालेली नाही. प्रवाशांना या आंदोलनाचा फटका बसू नये यासाठी दोन्ही बाजूंकडून बस सेवा स्थिगित ठेवण्यात आली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठी भाषिकांच्या हक्कासाठी संघर्ष सुरू असतानाच कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना सीमेवर जावून गोळ्या घाला असे आक्षेपार्ह वक्तव्य केले. यानंतर मराठी भाषिक आणि शिवसेना आक्रमक झाली. शिवसैनिकांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर शनिवारी आंदोलन केल्याची बातमी समजताच येथील कन्नड संघटनांनी एकत्र येत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. सर्किट हाऊस परिसरात हे आंदोलन करण्यात आले होते. बेळगावात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळल्यानंतर त्याचे पडसाद राज्यातही उमटू लागले आहेत.
या घटनेचे सांगलीतही पडसाद उमटले असून सांगलीत कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात येत आहे. सांगलीतील मिरज येथे कर्नाटकात जाणाऱ्या बसेस रोखून धरण्यात आल्या आहेत. त्याच प्रमाणे म्हैसाळ नाका येथे कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात येत आहे. शिवाय शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भीमाशंकर पाटील यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
बससेवा केली बंद
निपाणीहून सकाळपासून कोल्हापूरकडे जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या बसला काळे फासले आहे. महाराष्ट्राच्या काही बस निपाणी डेपोत थांबून असून तेथे पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. निपाणीहून कागल, कोल्हापूर, इचलकरंजी, गडहिंग्लज, हुपरी आणि मुरगोड बस सेवा बंद करण्यात आली आहे. चिकोडीहून मिरज, सांगली आणि नरसिंहवाडी बस सेवा बंद करण्यात आली आहे.