नवीदिल्ली, वृत्तसंस्था | देशभरामधील वेगवेगळ्या ठिकाणी सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन आंदोलने आणि मोर्चे काढण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन पत्रकार डॅनीस फ्रीडमॅन याने भारतातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. इतकचं नाही डॅनीसने ‘जगातील कोणत्याही नेत्याची हिटलरशी इतक्या वेळा तुलना झालेली नाही,’ असा संदर्भ देत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षरित्या टीका केली. मात्र याचवरुन भारतीय क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी डॅनिसला सुनावले आहे.
देशामधील आंदोलने आणि सुधारित नागरिकत्व कायद्याला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर हर्षा यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. यामध्ये त्यांनी देशातील तरुण आंदोलन करत रस्त्यावर उतरला असून त्याचे म्हणणे आपण ऐकून घेतले पाहिजे, अशा आशयाचे वक्तव्य केले असून जुन्या आठवणींचा संदर्भही दिला आहे. आपण भारतीय आहोत हे आपले भाग्य आहे असेही या पोस्टच्या शेवटी हर्षा यांनी म्हले आहे.
हर्षा यांच्या या पोस्टचा आधार घेत डॅनीसने ट्विट करत भारतातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. “या पोस्टसाठी मी हर्षाचे कौतुक करेन. त्याचा भारत देश सध्या तुटतोय. जगातील कोणत्याही देशातील नेत्याची अथवा सत्ताधारी पक्षाची तुलना इतक्या सातत्याने नाझीशी झालेली नाही. या विषयावर आपण सर्वांनी कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे. या विषयावर कठोर भूमिका घेणाऱ्या आपणमध्ये गौतम गंभीरचा समावेश मी करणार नाही. तो अपवाद आहे कारण त्याने दुफळी निर्माण करणाऱ्या पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे,” असे ट्विट डॅनीसने केले होते.
डॅनीसच्या या टीकेला हर्षा यांनी ट्विटवरुनच चोख प्रत्युत्तर दिले आहे. “नाही डॅनिस. माझा भारत देश विभागलेला नाही. भारत हा उत्साही तरुणांचा देश असून हे तरुण अनेक भन्नाट गोष्टी करत आहेत. आमचा भारत देश हा पूर्णपणे कार्यरत आणि परिपक्व लोकशाही देश आहे. आम्ही आमच्यातील मतभेद, निराश करणाऱ्या गोष्टींबद्दल उघडपणे बोलतो. असे असले तरी आम्ही कट्टर भारतीयच आहोत. तू तुलना करण्यासाठी जो शब्द (नाझी) वापरला आहे, तसे आम्ही कधीच नव्हतो आणि नसणार,” असे ट्विट हर्षा यांनी केले आहे. अवघ्या तासाभरामध्ये हर्षा यांच्या या ट्विटला दीड हजारहून अधिक जणांनी रिट्विट केले आहे. अनेकांनी डॅनीसला लोकशाही म्हणजे काय याचा अर्थच समजला नसल्याची टीका या ट्विटखाली दिलेल्या प्रतिक्रियांमधून केली आहे.