नागपूर प्रतिनिधी । येथील महापौर संदीप जोशी यांच्यावर मध्यरात्री गोळीबार करण्यात आला असून यात ते सुदैवाने बचावले आहेत. उपराजधानीतील या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, नागपूरचे महापौर संदीप जोशी हे जामठा येथील राष्ट्रीय कर्करोग संस्थेजवळील रसरंजन धाब्यावर कार्यक्रमासाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपून ते सुमारे १२ वाजण्याच्या सुमाराला आपले कुटुंबीय आणि मित्रांसह नागपूरला येत होते. त्यांच्यासोबत एकूण सात गाड्या होत्या. जोशी यांची फॉर्च्युनर ही गाडी सर्वांच्या मागे धावत होती. त्यांचा ताफा राष्ट्रीय कर्करोग संस्थेजवळ येताच अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. हल्ल्यादरम्यान हल्लेखोरांनी एकूण ४ गोळ्या झाडल्या. या गोळ्या त्यांच्या गाडीच्या काचा भेदून आत शिरल्या. मात्र सुदैवाने त्याना कोणतीही इजा झाली नाही.