नवी दिल्ली वृत्तसंस्था । काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘मेक इन इंडिया’ ऐवजी ‘रेप इन इंडिया’ असे वक्तव्य केल्याने मोठा गोंधळ उडाला होता. आता ‘रेप इन इंडिया’ वक्तव्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने झारखंड मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे उत्तर मागितले आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती.
राहुल यांनी संथालपरगणा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बलात्काराच्या वाढत्या घटनांच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले होते. त्या वेळी मोदींवर टीकास्त्र सोडताना मोदींचे ‘मेक इन इंडिया’ आता भारतात ‘रेप इन इंडिया’ बनले आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. भारतात दररोज बलात्कारासारखे गुन्हे घडत असल्याचेही राहुल गांधी म्हणाले होते. त्यावर संसदेत आणि संसदेबाहेरही राहुल याचा निषेध करण्यात आला. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून भाजप खासदारांनी लोकसभेत जोरदार हंगामा केला होता. भाजपच्या महिला खासदारांनीही राहुल गांधींनी माफी मागावी अशी जोरदार मागणी केली. या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाजही तहकूब करावे लागले होते.