जळगाव प्रतिनिधी । भरधाव वेगाने जात असलेल्या रिक्षाने रस्ता पार करणार्या पोलीस कर्मचार्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयसमोर घडली.
अपघातात दुचाकीवरील शहर पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर संतोष पाटील यांच्या डाव्या हाताला तसेच तोंडाला दुखापत झाली आहे. वाहतूक पोलिसांनी रिक्षा वाहतूक शाखेत जमा केली होती.
शहर पोलीस ठाण्यात कार्यरत ज्ञानेश्वर संतोष पाटील हे शुक्रवारी सायंकाळी न्यायालयीन कामकाज आटोपून रिपोर्ट करण्यासाठी दुचाकी (एम.एच.19 ए.ए.2117) वरुन पोलीस अधीक्षक कार्यालयात येत होते. यादरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयसमोर रस्ता पार करत होते. यादरम्यान स्वातंत्र्य चौकाकडून रेल्वेस्टेशन कडे प्रवासी घेवून जात असलेल्या रिक्षाने (एम.एच.19 व्ही.8023) त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघाताचा जोरदार आवाज झाला. यात दुचाकीवरील ज्ञानेश्वर पाटील हे दूरवर फेकले जावून जखमी झाले. तर रिक्षाच्याही काचा फुटल्याने नुकसान झाले. रस्त्यावर काचांचा खच पडला होता. प्रत्यक्षदर्शीनी तसेच वाहतूक पोलीस कर्मचार्यांनी धाव घेवून ज्ञानेश्वर पाटील यांना उचलले. त्याच्या हाताला दुखापत झाल्याने उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात हलविले. रिक्षाचालक परवेज मुसा पटेल वय 30 रा. तांबापुरा यांच्या पायाला दुखापत झाली असून तोही उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. प्रवाशांना रेल्वेगाडी मिळावी, यासाठी रिक्षाचालक भरधाव जात असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. अपघातांना वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त रिक्षा वाहतूक शाखेत जमा केली होती