जिल्हास्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेसाठी नोंदणीचे आवाहन

NMU 1

जळगाव प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने ३० डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी १४ डिसेंबर ही अंतीम मुदत देण्यात आली आहे. गुरुवार, २८ नोव्हेंबर रोजी या स्पर्धेचा आढावा घेण्यासाठी प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत स्पर्धेची गुणवत्ता अधिक वाढविण्यासाठी सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधनाबाबत अधिक माहिती करुन दिली जावी. अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

३० डिसेंबर रोजी चार ठिकाणी अविष्कार संशोधन स्पर्धा होणार आहे. जळगाव जिल्ह्याची स्पर्धा नुतन महाविद्यालय, धुळे जिल्ह्याची स्पर्धा विद्या विकास मंडळाचे सी.गो.पाटील महाविद्यालय, साक्री येथे, नंदुरबार जिल्ह्याची स्पर्धा तळोदा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे होणार आहे. तर विद्यापीठ प्रशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा विद्यापीठात होईल.

या स्पर्धेत विषय निहाय सहा गट करण्यात आले आहेत. त्यामध्ये पहिल्या गटात सामाजिकशास्त्र, शिक्षण, भाषा, मानव्यविद्या, ललित कला, दुसऱ्या गटात वाणिज्य, व्यवस्थापन आणि विधी, तिसऱ्या गटात विज्ञान ज्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जैवशास्त्र, गणित, पर्यावरणशास्त्र, गृह आणि संगणशास्त्र, चौथ्या गटात कृषि आणि पशुसंवर्धन, पाचव्या गटात. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, व सहाव्या गटात औषधिनिर्माणशास्त्र यांचा समोवश आहे. ही स्पर्धा पदवी, पदव्युत्तर, पदव्युत्तरपदवी आणि शिक्षक या चार संवर्गात होणार आहे. पोस्टर, मोड्युलद्वारे विद्यार्थ्यांना आपला संशोधनाचा अविष्कार मराठी, हिंदी अथवा इंग्रजी या भाषेत सादर करता येईल. प्रवेशीका शुल्क २०० रूपये ठेवण्यात आले आहे.

जिल्हास्तरावर विजेत्या झालेल्या स्पर्धकांना विद्यापीठस्तरावर दि. ७ व ८ जानेवारी, २०२० रोजी होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होता येईल. आजच्या या आढावा बैठकीत स्पर्धेचे समन्वयक प्रा.एस.आर.चौधरी, उपसमन्वयक प्रा.ए.जी.इंगळे, सल्लागार समितीचे प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्रा.एस.टी.इंगळे, डॉ.विवेक काटदरे, प्रा.डी.एस.पाटील यांच्यासह आयोजक महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेबाबत विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.

Protected Content