
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसे देशभक्त असल्याचे विधान थेट लोकसभेत केल्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. याआधी देखील साध्वींकडून गोडसेचा देशभक्त म्हटले होते. त्यावेळी स्वत: नरेंद्र मोदी यांनी या विधानाबद्दल साध्वींना कधीच मनापासून माफ करणार नसल्याचे म्हटले होते.

लोकसभेत एसपीजी दुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरू होती. त्यावेळी डीएमकेचे खासदार ए. राजा यांनी गोडसेने महात्मा गांधीची हत्या का केली? असा संदर्भ देत होते. गोडसेच्या मनात गांधीजींबाबतचा द्वेष ३२ वर्ष होता. त्यामुळे त्यांनी गांधीजींची हत्या केली. वेगळ्या विचारधारेचा असल्यामुळेच त्यांनी गांधीजींची हत्या केली. तशी कबुलीही गोडसेने दिली होती, असे राजा म्हणाले. तेवढ्यात साध्वी प्रज्ञा सिंह यांनी राजा यांना मध्येच थांबवले आणि तुम्ही एका देशभक्ताचे उदाहरण लोकसभेत देऊ शकत नाही, असे बजावले. त्यामुळे संसदेत एकच गदारोळ उडाला. धक्कादायक म्हणजे यावेळी भाजपच्या अनेक खासदारांनी साध्वीची बाजू घेत गोंधळ घातला. दरम्यान, या विधानाप्रकरणी साध्वींवर पुन्हा एकदा कारवाई होण्याची शक्यता भाजच्या सूत्रांनी वर्तवली आहे.


