जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील डॉ.आंबेडकर विचारधारा व इतिहास विभागाच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी संविधान गौरव दिनाच्या निमित्ताने “दुर्लक्षित लोकशाही: न उलगडलेले डॉ.बी.आर.आंबेडकर” या विषयावर डॉ.बाबासाहेब विचारधारा विभाग प्रमुख प्रा.डॉ.अनिल डोंगरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक शास्त्रे प्रशाळेच्या संचालक प्रा.डॉ. अर्चना देगावकर या होत्या. तर संगणशास्त्र प्रशाळेचे प्रा.डॉ. आर.जे.रामटेके, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.उमेश गोगाडीया, यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी बोलतांना प्रा.डॉ. अनिल डोंगरे म्हणाले की, आज संविधान स्वीकारून ७० वर्ष उलटले तरीही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली लोकशाही आपण रुजवू शकलो नाही. यासाठी प्रत्येकाने आपल्यातील व्यक्तिगत कार्यक्षमता वाढविल्याशिवाय सामाजिक कार्यक्षमता वृद्धिगत केल्याशिवाय लोकशाही प्रस्थापित होऊ शकत नाही. सुरवातीस प्रा.डॉ. आर.जे. रामटेके यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगीतले की, लोकशाही परिपक्व झाली आहे असे आपण म्हणतो पण गेल्या काही दिवसांपासून जे घडते आहे ते पाहता लोकशाही अपरिपक्व असल्याचे दिसते. राज्य घटनेचा वापर योग्य तऱ्हेने झाला नाही तर मानवी संस्कृती लोप पावेल. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतांना प्रा.डॉ.अर्चना देगावकर या म्हणाल्या की, डॉ.बाबासाहेबांची लोकशाहीची संकल्पना आजही आदर्श व प्रासंगिक असून सर्व समावेशक आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्नेहा जाधव व शारदा बाविस्कर यांनी स्वागत गीत गायन केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.विजय घोरपडे यांनी तर सूत्रसंचालन विद्यार्थी स्नेहा जाधव हिने तर आभार योगेश्वरी बाविस्कर हिने मानले.