नवी दिल्ली (वृत्तसंस्था) खासदार रक्षाताई खडसे यांची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या प्रशासकीय मंडळावर सदस्य म्हणून केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे.
भारत सरकारने पारित केलेल्या निफ्ट अधिनियम (2006) च्या माध्यमातून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी ला आयआयटी, आयआयएम या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थान समान फॅशन टेक्नॉलॉजी च्या क्षेत्रात शिक्षण व शैक्षणिक संशोधन विकास करण्यासाठी संवैधानिक दर्जा प्रदान केलेला आहे. ज्यामुळे ही संस्था विद्यार्थ्यांना डिग्री, सर्टिफिकेट व पीएचडी प्रदान करते.
या संस्थेने उत्कृष्ट शिक्षणाच्या माध्यमातून फॅशन उद्योगाला उत्कृष्ट डिझाइनर, व्यवस्थापक, उत्पादन क्षेत्राला तज्ञ दिलेले आहेत. या संस्थेतून आंतरराष्ट्रीय पातळीच्या दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत आहे. निफ्ट फॅशन क्षेत्रातील शिक्षण देणारी भारतातील सर्वोत्तम संस्था आहे. या राष्ट्रीय संस्थेच्या प्रशासकीय सदस्यपदी खासदार रक्षाताई खडसे यांची नियुक्ती झाल्यामुळे महाराष्ट्रात फक्त मुंबई, पुणे सारख्या महत्वाच्या शहरात असलेला फॅशन उद्योग व शिक्षणाचा संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना फायदा होईल.