भुसावळ प्रतिनिधी । शहरात रस्ते, साफसफाई यासह विस्थापितांचे पुनर्वसन आदी मुद्यांकडे सत्ताधारी व पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहे. त्यामुळे यासंदर्भात जनाधार पार्टीतर्फे नगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी पालिका प्रशासनाच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यासंदर्भात जनाधार पार्टीतर्फे मुख्याधिकारी करुणा डहाळे यांना निवेदन दिले. यात नमूद करण्यात आले की, गेल्या दोन वर्षांपासून भुसावळ शहराची अत्यंत गंभीर व विदारक अशी अवस्था आहे. नगराध्यक्ष व सत्ताधारी सुस्त झालेले आहेत. कोणाचाच कोणावर अंकूश राहिलेला नाही, त्यामुळे संपूर्ण जनता त्रस्त झाली असल्याचा आरोप जनाधार पार्टीने केला आहे. सामान्य जनतेसमोर अनेक समस्या निर्माण झालेल्या आहे व त्याचे निरसन करण्यास नगराध्यक्ष व पालिका प्रशासन असमर्थ ठरत आहेत. शहरात एकही मार्ग सुस्थितीत राहिलेला नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी गटारींची व्यवस्था नसल्यामुळे संपूर्ण शहरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया सारखे साथीचे आजार बळावत आहेत. विस्थापितांचे प्रश्न कायम असून, पुर्नवसनाचा प्रश्न गंभीर असताना पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप जनाधारने केला आहे.
मोर्चात यांनी घेतला सहभाग
याप्रसंगी मोर्चात जनाधारचे गटनेता उल्हास पगारे, संतोष त्र्यंबक चौधरी, दुर्गेश ठाकूर, आशिकखान शेरखान, नितीन धांडे, प्रदीप देशमुख, मुन्ना सोनवणे, प्रकाश निकम, सिकंदर खान, सलीम पिंजारी आदी सहभागी झाले होते.