मुंबई (वृत्तसंस्था) राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाशिव आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षांसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाटून घेतले जाईल तर पूर्ण पाच वर्षांसाठी उपमुख्यमंत्रीपद हे काँग्रेसकडे राहणार आहे. तसेच महामंडळे आणि समित्यांचे तिघं पक्षांमध्ये समसमान वाटप होणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे खासदार आणि सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय अमहमद पटेल यांच्यामध्ये मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून ठाकरे कुटुंबातील व्यक्तीला मुख्यमंत्रीपदावर बसवण्यास विरोध होत असल्याचे वृत्त होते. मात्र दोन्ही काँग्रेसने शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या निवडीबद्दल आमचा कोणताही आक्षेप नसल्याचे कळवले आहे. त्यामुळे शिवसेना कोणत्याही व्यक्तीला अडीच वर्षांसाठी या पदावर बसवू शकते. राज्यामधील सर्व महामंडळे आणि समित्यांचे समसमान वाटप केली जाईल असंही या बैठकीत ठरल्याचे समजते. तसेच कोणत्या व्यक्तीला मुख्यमंत्री निवडायचे हा निर्णय प्रत्येक पक्ष घेऊ शकतो असेही ठरले आहे.