नवी दिल्ली (प्रतिनिधी) राम मंदिरासंबंधीचा निकाल देशवासीयांनी शांततेने स्वीकारल्याबद्दल संपूर्ण देशवासीयांचे आभार व्यक्त करतो. तसेच, भारतीय न्यायप्रणाली देखील अभिनंदनास पात्र असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले आहे. अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी देशवासीयांशी आज संवाद साधला.
यावेळी मोदी म्हणाले की, अयोध्येवर निकाल लागला त्याचे समाजातील सर्वच घटक, धर्म आणि समुदायाच्या लोकांनी स्वागत केले आहे. प्राचीन भारतीय संस्कृती, सामाजिक बांधिलकी आणि परंपरेचे हे द्योतक आहे. आता सर्वांनी पुढे जाऊन न्यू इंडियाचे निर्माण करावे. असे न्यू इंडिया जेथे भय, कटुता आणि नकारात्मकतेला जागा नाही.” मोदी पुढे म्हणाले, सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणावर झालेल्या सुनावणीत सर्वच पक्षांची बाजू अतिशय संयमाने एकून घेतली. यानंतर सर्वांचा विचार करून आपला निकाल दिला ही अतिशय आनंदाची बाब आहे. या निकालाच्या माध्यमातून विविधतेत एकता या मंत्राचा आज प्रत्यय जगाला आला असल्याचेही मोदी म्हणाले.