चोपडा, प्रतिनिधी | तालुक्यातील वेले येथील अमर संस्था संचलित बालकाश्रमाला झारखंड राज्यातील धनबाद येथील सी.आय.एस.एफ. जवानांच्या एका तुकडीने विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी आले असता अनाथ मुलांना ३८,५०० रुपयांची मदत देवून माणुसकीचा प्रत्यय दिला आहे.
सुमारे एक महिना या जवानांची राहण्याची व्यवस्था येथे करण्यात आली होती. या कालावधीत त्यांची येथील अनाथ मुलांशी चांगलीच गट्टी जमली. फावल्या वेळात त्यांनी येथील अनाथ मुलांना चांगलाच जीव लावला. शौर्याच्या गोष्टी सांगितल्या तसेच धनत्रयोदशीच्या निमित्ताने बालकांना मिष्टान्न भोजन दिले. जाताना संपूर्ण तुकडीकडून येथील अनाथ मुलांसाठी निधी जमा करून एकूण ३८५०० रोख देणगी या अनाथाश्रमातील मुलांना देण्यात आली. त्यावेळी सी.आय.एस.एफ. टीमचे इन्स्पेक्टर प्रशांत प्रसून यांचा सत्कार बालकाश्रमाचे व्यवस्थापक शेषराव पाटील यांनी केला. यावेळी अमर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, टीमचे सब इन्स्पेक्टर विकास राठी, ए.के. सिंग, हेड कॉन्स्टेबल एस.व्ही. शिंदे, डी.एम. चौधरी तसेच बालकाश्रमचे ललित सोनवणे, बबन वारडे, श्रीकांत पाटील, अमोल पाटील, मुकेश राजपूत, रवींद्र पाटील, निवृत्ती महाजन आदी उपस्थित होते.