मुंबई प्रतिनिधी । सवर्ण गरीबांना आरक्षण लागू करण्याचा महत्वाचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
केंद्र सरकारने अलीकडेच सवर्ण गरीबांना १० टक्के आरक्षण लागू करण्याची घोषणा केली होती. हे विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये संमत करण्यात आले असून राष्ट्रपतींनीही यावर स्वाक्षरी केली आहे. यानंतर विविध राज्यांनी हे आरक्षण लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. गुजरातने सर्वप्रथम हे आरक्षण लागू केले होते. यानंतर आता महाराष्ट्राचा समावेश होणार आहे. कारण आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हे आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सवर्णांमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असणार्या कुटुंबांसाठी हे आरक्षण लागू असणार आहे. यासोबत अन्य निकषांमध्ये पाच एकरपेक्षा कमी शेतजमीन, १००० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेले घर, शहरी भागात ९०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाचा निवासी भूखंड आणि अधिसूचित नसलेल्या भागात १८०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाचा निवासी भूखंड आदी अटींचा समावेश आहे.