मुंबई प्रतिनिधी । आम्ही सत्तेसाठी भाजपसोबत युती केली आहे. सत्तेसाठी निवडणूक लढवत आहे. अशी कबुली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भर सभेत दिली. पिंपरी मतदार संघातील महायुतीचे उमेदवार अॅड. गौतम चाबुकस्वार यांच्या प्रचारार्थ पिंपरी येथे आयोजित सभेत उद्धव ठाकरे बोलत होते.
‘आमचे वाद शेतकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी झाले होते. आता शिवसेना आणि भाजप याच एका विचाराने एकत्र आले आहे. गोरगरीबांचे आणि महाराष्ट्राचे भले करण्यासाठी सत्ता हवी आहे, असेही त्यांनी सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, आता सभांची आवश्यकता आहे असे वाटत नाही. समोर लढायला कोण आहे. टीका करायची झाली तर करायची कोणावर? राष्ट्रवादीचे नेते शिवसेना भाजपात जाऊ नये म्हणून राष्ट्रवादी त्यांचा दरवाजा धरून बसली आहे. तर काँग्रेस आधीच भुईसपाट झाली आहे. दोन्ही पक्षांचा एकमेकांना ताळमेळ नाही. त्यांना उमेदवारदेखील मिळत नाही. अपक्ष उमेदवरांना पाठींबा देण्याची वेळ यांच्यावर आली आहे.