पुणे, वृत्तसंस्था | देशात सध्या ९४ लाख पदवीधर असून त्याहून अधिक शिक्षण घेतलेले तरुण आहेत. परंतु, हे सर्व जण बेरोजगार आहेत. शिक्षित तरुणांना रोजगार देण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. दर चार व्यक्तीपाठीमागे एक जण बेरोजगार आहे. सरकार कोणतीही पूर्वसूचना न देता आपले निर्णय बदलत असल्याने गेल्या अडीच वर्षात देशातील सव्वा तीन कोटी लोकांना आपल्या नोकऱ्या गमवण्याची पाळी आली आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसने आज येथे एका पत्रकार परिषदेत केला.
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. देशात ज्याप्रमाणे लोक शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. तसे-तसे बेरोजगारी वाढत आहे, असा दावा केंद्र सरकारने केला असून तो निव्वल हास्यास्पद आहे. देशात गेल्या १५ वर्षात सर्वात कमी विकासदर नोंदवला गेला आहे. ९४ लाख पदवीधर असून त्याहून जास्त शिक्षण घेतलेले तरुण बेरोजगार आहेत. देशात दर चार व्यक्तीमागे एक जण बेरोजगार आहे. ऑटो सेक्टरमध्ये मंदी आल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बेजबाबदार वक्तव्य केले आहे. ओला आणि उबेरमुळे कार उद्योगात मंदी आली आहे का?, सरकार त्यासाठी काय पावले उचलत आहेत. ओला-उबेर यापूर्वी होत्या. मग आर्थिक मंदी का नाही आली. अर्थमंत्री तसेच केंद्रातील सरकार यासाठी काय-काय उपाययोजना करतेय, असा सवालही काँग्रेसने विचारला आहे.
बँक सेक्टर पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारकडून १० बँकांचे विलीनीकरण करण्यात आले. त्यानंतर १० बँकांचे चार बँकात रुपांतर करण्यात आले. हा काही उपाय होऊ शकत नाही. पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेतील रोख रक्कम काढण्यावर घातलेली बंदी सरकारने दूर करावी, अशी मागणीही काँग्रेसकडून करण्यात आली आहे. या बँकेच्या अफरातफरीप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे. नाही तर नीरव मोदीसारखे बँकेला चुना लावून परदेशात पळून जातील, असा इशाराही काँग्रेसने या पत्रकार परिषदेत दिला.