जळगाव (प्रतिनिधी) बोदवड शहर व परिसरातील ग्रामीण भागात आताच पाण्याची तीव्र टंचाई भासत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे बंद पडलेली मुक्ताई उपसा जलसिंचन पुन्हा सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
बोदवड शहर व ग्रामीण भागात सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. बऱ्याच गावांना पाणी मिळण्याचा दुसरा कुठलाही स्त्रोत नाही, त्यामुळे माणसांचे व गुरांचे हाल होत आहेत. या ठिकाणी मुक्ताई उपसा जलसिंचन योजना मंजूर करण्यात आली आहे, त्यावर असलेले 110 कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यात आले आहे. त्या पैकी शासनाने 48 कोटी रुपये दिले असून बँकेने 78 कोटींचे व्याज माफ केले होते. अशी कर्जमुक्त झालेली योजना आज धूळ खात पडलेली आहे, ही योजना राज्य शासनाच्या तापी खोरे महामंडळाच्या ताब्यात आहे. सध्या या भागात 20 दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे, अशा स्थितीत शासनाने ही योजना पुन्हा सुरु केल्यास बोदवड तालुक्याचा पाणी प्रश्न सुटणार आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी हे निवेदन दिले आहे.