जळगाव, प्रतिनिधी | खान्देशकन्या बहिणाबाई यांच्या जीवनानुभवातून निर्माण झालेल्या खान्देशी मातीतील कविता हा मराठी साहित्यातला अनमोल ठेवा आहे. बहिणाबाईंच्या कवितेत ग्रामीण भागातील महिलांच्या दैनंदिन जीवनाचे आणि त्यांच्या गुणांचे जे वर्णन त्यांनी केले आहे, त्या शब्दांना चित्रांचे रूप देण्याचे आव्हानात्मक आणि कलात्मक कार्य येथील सुप्रसिद्ध अन ज्येष्ठ चित्रकार विजय जैन ‘चित्तगवरी’ ही थीम घेऊन यांनी मोठ्या हिकमतीने पूर्ण केले आहे. त्यांच्या या आगळ्या-वेगळ्या मॉडर्न शैलीतील चित्रांचे एक प्रदर्शन सध्या शहरातील पु.ना. गाडगीळ आर्ट गॅलरीत सुरु आहे. हे प्रदर्शन ३० सप्टेंबरपर्यंत दररोज सकाळी ११.०० ते सायंकाळी ८.०० रसिकांसाठी खुले आहे. या चित्र प्रदर्शनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय. अशाच प्रकारचे अन्य एक प्रदर्शन मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरीत घेण्यासाठी सध्या त्यांची तयारी सुरु आहे.