जळगाव, प्रतिनिधी । जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर माजीमंत्री गुलाबराव देवकर आणि चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यासह २८ जणांनी जामिनासाठी आणि शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी केलेल्या अर्जावर आता उद्या (दि.१९) निर्णय होणार आहे. त्यांच्या अर्जावर आज (दि.१८) निकाल दिला जाणार होता पण तो आता उद्यावर गेला आहे. दरम्यान या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
जळगाव येथे नऊ जागांवर बांधण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा गुन्हा धुळयातील विशेष न्यायालयात सिध्द झाला होता. न्यायाधीश सृष्टी निळकंठ यांनी निकाल देताना सुरेश जैन, राजेंद्र मयुर, प्रदीप रायसोनी, जगन्नाथ वाणी यांच्यासह ४९ आरोपींना वेगवेगळया कलमांमध्ये सक्तमजुरीची शिक्षा आणि दंड ठोठावला आहे. दंडाची एकूण रक्कम १८१ कोटी २४ लाख ५९ हजार एवढी आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर आता उच्च न्यायालयात निकालास आव्हान देण्यासाठी धडपड सुरु झाली आहे.