जळगाव, प्रतिनिधी | वृक्षारोपण करण्यासह वृक्षसंवर्धनावरही भर दिला पाहिजे, असे मत जेष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ.जयंत नारळीकर आणि गणिततज्ज्ञ मंगला नारळीकर यांनी आज (दि.१६) येथे मांडले. जिल्हा शासकीय अभियंता सहकारी पतपेढीच्या सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग परिसरातील कार्यालयात सोमवारी ओझोन दिवसानिमित नारळीकर दाम्पत्याच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता शैलेन्द्र भंगाळे, उपविभागीय अधिकारी संजय निकुंभ, चेअरमन साहेबराव पाटील, सचिव पी.एन.पाटील, संचालक स्वाती नन्नवरे, डी.जे. निकम, लिपिक राजेंद्र पाटील, सभासद ब्रह्मानंद तायडे आदी उपस्थित होते. यावेळी बकुळ, पारिजात, पिंपळ, कडूनिंब अशा विविध वृक्षांचे रोपण मान्यवरांनी केले. यावेळी कार्यालयात भेट देत पतपेढीच्या कार्याची व उपक्रमांची माहिती नारळीकर दाम्पत्याने जाणून घेतली.
शिवमला ‘आयुका’चे निमंत्रण :- सभासद शैलेंद्र भंगाळे यांचा मुलगा शिवम इयत्ता ११वीत शिकत असून त्याचा खगोलशास्त्राकडे ओढा आहे. त्याच्याशी डॉ.नारळीकर यांनी चर्चा करून त्याच्यातील वैज्ञानिक कुतूहल पाहून त्याचे गुण हेरत त्याला पुण्यातील खगोलशास्त्रातील जागतिक संशोधन संस्था ‘आयुका’ येथे येण्याचे निमंत्रण दिले.