भुसावळ, प्रतिनिधी | “विद्यार्थीदशेतच समाजसेवेची वृत्ती आपण जोपासली पाहिजे. सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून कार्य केले तर आपल्या आर्थिक उन्नतीसह मानसिक समाधानही मिळते. गुणवत्तेबरोबरच ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करुन सामाजिक भावना विकसित केली पाहिजे. कौशल्याभिमुख अभियंत्यांना उज्ज्वल भवितव्य आहे,” असे मत प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी भुसावळ येथील हिंदी सेवा मंडळ संचलित श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात आज (दि.१५) अभियंता दिन साजरा करण्यात आला, त्या प्रसंगी मांडले.
भारताची महत्वकांक्षी चांद्रयान मोहीम ही अयशस्वी ठरलेली नसून त्यातून भरपूर काही शिकण्यासारखे आहे. इतर देशांच्या तुलनेत आपण ९५% पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालो, तसेच यात वापरले गेलेल्या सर्व तांत्रिक वस्तू भारतातच निर्माण केल्या होत्या म्हणून आपण सर्वांना भारतीय सॅटेलाईट व टेलिकॉम क्षेत्राचा अभिमान वाटायला हवा असे प्राचार्य म्हणाले.
“ध्येय साध्य करण्यासाठी आपली आवड आणि मर्यादा समजून घेऊन परंपरागत शिक्षण घेण्यापेक्षा जरा वेगळा मार्ग स्वीकारून त्यास दृष्टिकोन, कौशल्य आणि मेहनतीची भक्कम जोड देण्याची गरज असते,” असा कानमंत्र प्रा.सुधीर ओझा यांनी दिला. यावेळी डॉ.पंकज भंगाळे, प्रा.अविनाश पाटील, डॉ.गिरीष कुळकर्णी, प्रा.अजित चौधरी, प्रा.दिनेश पाटील, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.