भुसावळ प्रतिनिधी । येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेतर्फे उमेदवारी मागितली असून संधी मिळाल्यास संधीचे सोने करून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र संघटक निलेश अमृत सुरळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सुरळकर पुढे म्हणाले की, भुसावळ मतदारसंघातील एमआयडीसीत नवीन उद्योग आणून बेरोजगार तरुणांना रोजगार देणे, शेतकऱ्यांना दिवसा शेतात वीजपुरवठा, हतनुर धरणावर जलविद्युत प्रकल्प सुरू करणे, सर्व शेती सिंचनाखाली आणणे,पाणी प्रश्न सोडवणे आदी समस्या सोडवण्यात येतील. भुसावळ शहरातील दवाखान्यात शवविच्छेदनाची व्यवस्था नसून त्याकडे विशेष लक्ष देण्यात येईल. कचरा संकलन आणि योग्य विल्हेवाट,रेल्वे प्रशासनाने अन्यायकारकरित्या सुमारे शंभर वर्षांपूर्वी पासून असलेल्या पाठवलेल्या झोपडपट्टीधारकांना पर्याय योग्य जागा मिळवून देत त्यांना हक्काची घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील. सर्व समाजाला सोबत घेऊन चालणार असून पक्षाने दिलेला कुठलाही आदेश मान्य राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.