बेंगळुरू, वृत्तसंस्था | ‘चांद्रयान-२’ च्या विक्रम लँडरची चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होणार होती. मात्र, अचानक संपर्क तुटला. अवघ्या २.१ किलोमीटरवर असताना अचानक त्याचा मार्ग बदलला. ‘विक्रम’च्या या ‘हार्ड लँडिंगच्या कारणांचा शोध भारतीय अवकाश संशोधन संस्था घेणार आहे. लँडरच्या छायाचित्रांची तपासणीही सुरू झाली आहे. लँडर भरकटण्याच्या कारणांचा शोध घेण्यात येत आहे.
‘काही छायाचित्रे शनिवारी हाती लागली. त्यात चंद्राच्या पृष्ठभागावर दिसणारी वस्तू विक्रम लँडर आहे की, आणखी काही याचा तपास करायचा होता. त्यानंतर अक्षांश आणि रेखांशच्या आधारे त्याच ठिकाणावरील जुन्या छायाचित्रांचे निरीक्षण केले. त्यात कोणतीही वस्तू दिसून आली नाही. नव्याने टिपल्या गेलेल्या छायाचित्रांत ही वस्तू दिसत होती. त्याच आधारे हे विक्रम लँडर आहे, असा अंदाज व्यक्त केला होता,’ असे चांद्रयान- २ मोहिमेशी संबंधित एका शास्त्रज्ञाने सांगितले.
विक्रम लँडरवरील ट्रान्सपोंडर अजूनही पूर्णपणे सुरक्षित आहे की, नाही याचा तपास करायचा आहे, असे इस्रोमधील सूत्रांनी सांगितले. विक्रम लँडरचा शोध तीन दिवसांच्या आत घेतला जाऊ शकतो असे आधी सांगण्यात आले होते. त्याचदरम्यान इस्रोकडून करण्यात येत असलेल्या तपासात ‘अज्ञात’ किंवा ‘नैसर्गिक’ घटनेवरही लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.