जळगाव, प्रतिनिधी | आज महापालिकेच्या चारही प्रभाग समितीमध्ये स्वयंमसेवी संघटनेच्या प्रतिनिधींची सदस्यांची निवड करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी उपायुक्त मिनिनाथ दंडवते, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते.
कोरम अभावी प्रभाग समिती १ ची निवड रद्द
यात प्रभाग समिती क्रमांक १ च्या कार्यक्षेत्रातील २० सदस्यांपैकी केवळ ८ सदस्य उपस्थित असल्याने कोरम अभावी प्रभाग क्र.१ ची विशेष सभा रद्द करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक २ साठी हजर असलेल्या सदस्यांची नावे नगरसचिव सुनिल गोराणे यांनी वाचून दाखविली. या समिती कार्यक्षेत्रात २० सदस्य असून आजच्या बैठकीला ११ सदस्य उपस्थित होते. प्रभाग अधिकारी सुभाष मराठी यावेळी उपस्थित होते. यात ११ पैकी चार प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले. यात अनिल उत्तम पाटील, रमाकांत पाटील, संतोष इंगळे यांची प्रभाग समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली. याला सूचक म्हणून नगरसेवक चेतन संकेत अनुमोदक म्हणून नगरसेवक मुकुंदा सोनवणे होते. प्रभाग समिती क्रमांक ३ साठी हजर असलेल्या सदस्यांची नावे वाचून वाचून दाखवण्यात आली. या कार्यक्षेत्रात १९ सदस्य कार्यरत आहेत. त्यापैकी १३ सदस्य हजर असल्याने सभेला सुरुवात करण्यात आली. ५ नामनिर्देशनत्रांपैकी २ नामनिर्देशनपत्र अपात्र ठरविण्यात आली. यावेळी सभापती जितेंद्र मराठे यांनी प्रभाग अधिकारी यांना नावे वाचून दाखवण्याची सूचना केली. प्रभाग अधिकारी एस. एस. पाटील यांनी प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील २ सदस्यांना विठ्ठल मगर पाटील, संजय बाबुराव विसपुते यांची नावे वाचून दाखविली. यांना सूचक नगरसेवक राजेंद्र पाटील, अनुमोदक नगरसेविका शुचिता हाडा ह्या होत्या. सभापती मराठे यांनी दोघांची निवड जाहीर केली. प्रभाग समिती क्रमांक ४ मध्ये १६ सदस्यांपैकी ८ सदस्य हजर असल्याने सभेस सुरुवात करण्यात आली. नगरसचिव अनील गोराणे यांनी विषय वाचून दाखवला. प्रभाग अधिकारी यांनी छाननी करून पात्र उमेदवारांची अपात्र उमेदवारांची यादी दिली. सभापती जितेंद्र मराठे यांनी प्रभाग अधिकार्यांना जे सदस्य निवडून आले आहेत त्यांची नावे वाचून दाखवण्याचे सांगितले. यात नितीन भास्कर इंगळे, सीमा सुरेश झरे, सागर रतिलाल महाजन यांची नावे वाचून दाखवण्यात आली. तिघांना सूचक म्हणून नगरसेवक कुलभूषण पाटील अनुमोदक म्हणून नगरसेविका शोभा बारी ह्या होत्या. यानंतर सभापती मराठे यांनी तिन्ही सदस्यांची निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी प्रभाग समिती १ चे प्रभाग अधिकारी व्ही. ओ. सोनवणी, प्रभाग समिती २ चे प्रभाग अधिकारी सुभाष मराठे, प्रभाग समिती ३ चे प्रभाग अधिकारी एस. एस. पाटील, प्रभाग समिती ४ चे प्रभाग अधिकारी उदय पाटील उपस्थित होते.