नवी दिल्ली वृत्तसंस्था । शैक्षणिक परीक्षा महत्वाच्या असल्या तरी त्या सर्व काही नसल्याचे प्रतिपादन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विविध माध्यमधून हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित करण्यात आला. यात पंतप्रधान मोदी यांनी शैक्षणीक परीक्षा ही खूप महत्वाची असली तरी जीवनातील अन्य परीक्षादेखील तितक्याच महत्वाच्या असल्याचे प्रतिपादन केले. ते म्हणाले की, एखाद्या परीक्षेत अपयश आले म्हणजे सर्व काही संपले असे नसते. तर परिक्षेच्याही पलीकडे एक जग असून तुम्हाला तिथे यशस्वी होण्यासाठी अमर्याद संधी असतात.
परीक्षा पे चर्चा हा या मालिकेतील पंतप्रधान मोदी यांचा दुसरा कार्यक्रम होता. यात त्यांनी दिल्लीत दोन हजार विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला. याशिवाय विविध माध्यमांमधून त्यांनी देशभरातील विद्यार्थ्यांना संबोधीत केले. ते म्हणाले की, परिक्षेच्या कालखंडात विद्यार्थ्यांना तणाव येत असला तरी याला प्रयत्नपूर्वक दूर सारता येते. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त पध्दतीत परिक्षेला सामोरे जाण्याचे आवाहनदेखील पंतप्रधान मोदी यांनी केले.