नवी दिल्ली, वृत्तसंस्था | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरबाबतचे विधान मागे घेतल्याने भाजपने त्यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. राहुल यांनी मनापासून नव्हे तर परिस्थितीमुळे घुमजाव केले आहे, अशी टीका भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. राहुल हे पाकिस्तानच्या हातचे बाहुले बनले आहेत. त्यांच्या वक्तव्याचा आधार घेऊन पाकिस्तान संयुक्त राष्ट्रामध्ये भारताविरोधात भूमिका मांडत असून राहुल आणि काँग्रेसने याप्रकरणी माफी मागावी, अशी मागणीही जावडेकर यांनी केली आहे.
जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींवर जोरदार टीकास्त्र सोडले. राहुल यांचे वक्तव्य म्हणजे त्यांची बौद्धिक दिवाळखोरीच आहे. काश्मीरमध्ये जी परिस्थिती नाही, त्यावर राहुल बोलत आहेत. ते पाकिस्तानच्या हातचे बाहुले बनले आहेत. त्यांच्या काश्मीरबाबतच्या वक्तव्याची दखल घेऊनच पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघाला एक पत्र दिले आहे. राहुल यांच्या वक्तव्याविरोधात देशभरातून पडसाद उमटल्यानंतर राहुल यांनी घुमजाव केला आहे, असेही जावडेकर म्हणाले.
राहुल गांधी हे काश्मीरच्या नावाने व्होटबँकेचे राजकारण करत असल्याचा आरोपही जावडेकर यांनी यावेळी केला. वायनाडमध्ये निवडून आल्यानंतर राहुल यांच्या भूमिकाही बदलल्यात का ? असा सवाल करतानाच ज्यांनी देशात आणीबाणी लागू केली, त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोलाही जावडेकर यांनी हाणला. जम्मू-काश्मीरमध्ये जाण्यास मनाई केल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना काश्मीरमधील लोक किती यातना सोसत असतील, याचा मला अंदाज येत असल्याचे राहुल यांनी म्हटलं होते.