मुंबई प्रतिनिधी । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा विवाह आज पार पडला.
लोअर परळ येथील सेंट रेजिस येथे आज दुपारी १२ वाजून ५१ मिनिटांनी अमित आणि मिताली लग्नाच्या बेडीत अडकले. या सोहळ्यासाठी सेंट रेजिस हॉटेल फुलांनी सजवण्यात आले होते. स्वत: राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे पारंपारिक पोषाखात आले होते. मनसेचे कार्यकर्तेही भगवे फेटे बांधून येणार्या पाहुण्यांचे स्वागत करत होते. लग्नघटिका जवळ येताच मिताली यांना पालखीतून मंडपात आणण्यात आलं. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत अमित आणि मिताली लग्नाच्या बेडीत अडकले. मिताली फॅशन डिझायनर आहे. प्रख्यात बालरोग तज्ञ संजय बोरूडे यांची त्या कन्या आहेत.
याप्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, उद्योगपती रतन टाटा, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, जयदेव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, अजित पवार, सचिन तेंडुलकर, आशा भोसले, अमिर खान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे, गायिका पद्मजा फेणाणी आदींनी या सोहळ्याला उपस्थिती लावली.