जळगाव प्रतिनिधी| धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरातील वाघ नगर पंपिंग रोडवरील रेल्वे रुळावर आज सकाळी घडली आहे. याबाबत रामानंदनगर पोलिस अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कैलास मंगलसिंग बोरसे (वय 35, रा. देवगाव- पारगाव ता. चोपडा ह. मु. खंडेराव नगर) हे सेंटिंग काम करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास कैलास बोरसे हे मासे पकडण्यासाठी गिरणा नदीवर जात होते. गिरणा पंपिंगकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे रुळावरून जात असताना अचानक आलेल्या रेल्वेचा फटका बसल्याने जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अपलाईन वरील रेल्वे थांबा क्रमांक 415 /24 ते 415/26 दरम्यान घडली.
दोन तासांपर्यंत ॲम्बुलन्स न आल्याने जागेवरच पडुन होता. जळगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक यांच्या खबरीवरून रामानंदनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात पत्नी सुनीता, आठ वर्षाची मुलगी रोशनी, आई-वडील असा परिवार आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ सतीश डोलारे, पो.ना. निलेश दंडगव्हाळ करीत आहे.