जळगाव, प्रतिनिधी | महापूरामुळे कोल्हापूर आणि सांगली येथे अनेक कुटुंबांचे संसार उध्वस्त झाले आहेत. त्याचबरोबर तेथील फोटोग्राफर बांधवांचे फोटो स्टुडिओही पाण्यात बुडाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव येथील प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनच्या वतीने ‘जागतिक छायाचित्रण दिन’ अतिशय साध्या पद्धतीने कुठलाही बडेजाव न करता शहराच्या महापौर सीमा भोळे यांच्याहस्ते कॅमेरा पूजन करून साजरा करण्यात आला.
दरम्यान कार्यक्रमाच्या सुरवातीला अतिवृष्टीत, पुरात मरण पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमात होणारा स्नेहभोजन, शाल-श्रीफळ, बुके आदींचा खर्च टाळून ‘छायाचित्रण दिन’ शहरातील प्रत्रकार भवनात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी शहराच्या प्रथम नागरिक महापौर सीमा भोळे यांच्यासह पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष अशोक भाटिया यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंत पाटील, उपाध्यक्ष सचिन पाटील, सचिव- अभिजित पाटील, सह सचिव- संधिपाल वानखेडे, पांडुरंग महाले, सुमित देशमुख, अरूण इंगळे, प्रकाश लिंगायत, योगेश चौधरी, जुगल पाटील, भुषण हंसकर, धर्मेंद्र राजपूत, रोशन पवार, अभिषेक अटवाल, शब्बीर सय्यद, सतीश जगताप, अतुल वडनेरे, शैलेंद्र सोनवणे, सुरेश सानप, शैलेश पाटील, दीपक पाटील, ज्ञानेश्वर पाटील आदींची उपस्थित होती.