मंगेश चव्हाण यांनी बसविलेले सीसीटिव्ही कॅमेरे कुणाला खुपताहेत ?

चाळीसगाव दिलीप घोरपडे । शहरातील युवा उद्योजक मंगेश चव्हाण यांनी वाढदिवसानिमित्त शहरात बसविलेल्या सीसीटिव्हीची उपयुक्तता सिध्द झाली असतांना याला राजकीय चष्म्यातून पाहत सोशल मीडियात खिल्ली उडविणे कितपत योग्य आहे ? याचा विचार चाळीसगावकरांनी करण्याची गरज आहे.

प्रत्येक बाबतीत राजकारण का ?

चाळीसगावातील राजकीय संघर्ष हा अलीकडच्या काळात अधिक टोकदार बनला आहे. प्रत्येक बाबीला राजकीय आयाम दिला जात आहे. या अनुषंगाने युवा उद्योजक मंगेश चव्हाण यांनी शहरात लावलेले सीसीटिव्ही कॅमेरे हेदेखील आता राजकीय मुद्दा बनले आहेत. दोन दिवसांपासून सोशल मीडियात काही महाभाग या सीसीटिव्ही कॅमेर्‍यांवरून टीका करत आहेत. खरं तर, राजकीय मुद्यावरून टीका करणे गैर नाही. तो आपला सर्वांचा संवैधानिक अधिकार आहे. तथापि, सीसीटिव्हीसारख्या सार्वजनिक जीवनातील उपयुक्त घटकाबद्दल जर असे होत असेल याला काय म्हणणार ?

चाळीसगाववर जागता पहारा

चाळीसगाव शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार वाढत असलेल्या औद्योगिक वसाहत ग्रामीण भागातून नवीन प्लॉटिंग भागांमध्ये राहायला आलेले ग्रामीण रहिवाशी यामुळे शहर संपूर्ण गजबजलेले आहे. यामुळे सीसीटीव्ही कॅमेर्‍यांसारख्या यंत्रणेची शहरभर आवश्यकता होती. शहराची ही गरज लक्षात घेता युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते मंगेश दादा चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून चाळीसगाव शहरातील संपूर्ण मोक्याच्या रस्त्यांवर चौकांमध्ये, बाजारपेठ तसेच शाळा महाविद्यालय या ठिकाणी अद्यावत सीसीटीव्ही कॅमेरे आपल्या स्वखर्चाने बसवून शहरवासीयांना सुरक्षेचा मोठा आधार दिला आहे. या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमुळे चाळीसगाव शहरात होणार्‍या भुरट्या चोर्‍या, मुलींची छेड खानी व काही घरफोड्या दुकान फोड्या यातील आरोपी नजरकैद होऊ लागले आहेत. यामुळे पोलीस यंत्रणेला आरोपी लवकरात लवकर पकडण्यास मदत होऊ लागली आहे यामुळे या सीसीटीव्ही कॅमेरा च्या जागता पहारा ने मंगेश दादा यांनी चाळीसगाव शहरावर पहारा बसवला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

हा आदर्श घ्या

आपल्या वाढदिवसाला दारू-मटणाच्या पार्ट्या करून डीजेच्या तालावर धांगडधिंगाणा घालणारे अनेक लोक पाहिले आहेत किंवा फक्त लोकांनी हार-तुरे आणून आपला सत्कार करावा अशी भावना असणारे राजकारणी देखील खूप आहेत. परंतु आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरवासीयांना व शाळकरी विद्यार्थ्यांना उपयोग होईल अशी कायमस्वरूपी यंत्रणा दातृत्वाचे दान करून आपली उपयुक्तता योग्य प्रमाणे दाखवून देणे यात मोठेपणा आहे. असा वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श इतरही राजकीय नेत्यांनी घेण्याची आवश्यकता आहे.

काही तरी चांगले पहा

गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियावर चर्चा सुरू होती की सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चाळीसगावकरांना काय दिसते ? फक्त राजकीय मतभेद म्हणून कुणाला काय दिसत असेल तो ज्याचा त्याचा भाग आहे. परंतु एक जागरूक नागरिक व पत्रकार म्हणून या सीसीटीव्ही कॅमेरे यांना शहरवासीयांना खर्‍या अर्थाने सुरक्षा दिली आहे हे निश्‍चितच दिसून येत आहे. राजकारण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. म्हणून प्रत्येक बाबीत राजकारण पाहता कामा नये. यामुळे कोणत्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधीतर्फे अथवा त्यांच्या सहकार्‍यांतर्फे जर काही चांगले होत असेल तर चाळीसगावकरांनी याचे खुल्या दिल्याने स्वागत करणे गरजेचे आहे. इथे प्रश्‍न भाजपचा नाही. तर विरोधातील राष्ट्रवादी तसेच शिवसेनेसह अन्य पक्षाचे नेते अथवा समर्थकांनी समाज हिताचे काम केले तर इतरांच्या पोटात दुखण्याचे काही एक कारण नाही. माझे चाळीसगाव आणि खरं तर आपले चाळीसगाव हे किमान चांगल्या कामांसाठी तरी राजकारण विरहीत व्हावे हीच अपेक्षा. आणि सर्व राजकीय पक्षांच्या समर्थकांनी विरोधकांकडून होणारे चांगले काम पाहण्याची गरज आहे. भलेही तुम्ही विरोधकांचे उघड कौतुक करू नका…मात्र काड्यासुध्दा नकोच !

2 Comments

  1. chhotulal Borse
  2. Rupesh pawar

Add Comment

Protected Content