जळगाव, प्रतिनिधी | शहरातील प्रजापत नगरात एकाच रात्री चोरट्यांनी बाहेरगावी गेलेल्या तीन कुटुंबांची बंद घरे फोडून दागिने, कपडे व रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज लांबवल्याची घटना शुकवारी सकाळी उघडकीस आली. एका घराशेजारी राहणाऱ्यामुळे तीनही ठिकाणच्या चोरीच्या घटना उघड झाल्या आहेत.
एकाच रात्रीच्या तीन चोरीच्या घटनांनी येथील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून याभागात पोलिसांची गस्त नसल्याने या घटना घडल्याचा
संतापही येथील रहिवाशांनी व्यक्त केला आहे.
प्रजापत नगरातील हनुमान मंदिराच्या पाठीमागील बाजूस मुख्य रस्त्यालगत निरज दिलीप व्यास, राजस्थानी स्वयंपाकी कारागीर शंकरलाल गंगाराम ओझा, बलदेवभाई पटेल या तिनही कुटुंबांची घरे चोरट्यांनी फोडली आहेत. व्यास यांच्या घरातून १० ग्रॅम सोन्याचे दागिने, २० हजार रुपये रोख असा ३० ते ४० हजार रुपयांचा ऐवज लांबवला तर ओझा यांच्या घरातून १५ ते २० हजार रुपयांची रोकड चोरली आहे. बलदेवभाई पटेल हे गावाहून परतल्यावर त्यांच्या घरुन नेमका किती मुद्देमाल चोरीस गेला ते कळणार आहे. दरम्यान तिघाही ठिकाणी चोरट्यांनी चिल्लरला हातही लावलेला नाही हे विशेष. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे.