चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील मेहुणबारे येथील वैद्यकीय अधिकार्यांची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज विजय रमेशराव देशमुख यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी त्यांना वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील मेहुणबारे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैदेही पंडित यांच्यावर कारवाई करण्याची मागणी संभाजी सेनेतर्फे एका पत्रकान्वये करण्यात आली होती.
या संदर्भात संभाजी सेनेतर्फे मेहुणबारे येथील विभागीय प्रमुख विजय रमेशराव देशमुख यांनी आरोग्य मंत्र्यांना १८ जुलै रोजी निवेदन पाठविण्यात आले होते. या निवेदनात नमूद केले आहे की, मेहुणबारे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. वैदेही माधव पंडित या गत सुमारे पाच वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मात्र त्या नियमानुसार मेहुणबारे येथे वास्तव्यास नसून त्या ये-जा करतात. यामुळे सकाळी साडेआठ वाजेची वेळ असतांनाही त्या दहापर्यंत कार्यालयात येतात. तर त्या नियुक्तीच्या ठिकाणी राहत नसल्यामुळे रूग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असतात. या संदर्भात त्यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. तसेच त्यांची ओपीडी ही फक्त एक ते दीड तासच सुरू राहते. यामुळे गरजू रूग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. यातच डॉ. पंडित या आपली खासगी प्रॅक्टीस करत असल्याचा प्रकारदेखील सुरू असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला होता. या संदर्भात संबंधीत डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करूनदेखील कोणतीही उपायोजना करण्यात आलेली नाही. परिणामी १० ऑगस्टपर्यंत यावर कारवाई न झाल्यास स्वातंत्र्यदिनी चाळीसगावच्या तहसील आवारात आत्मदहन करणार असल्याचा इशारा या पत्रकात विजय रमेशराव देशमुख यांनी दिला होता.
दरम्यान, हे निवेदन देऊनदेखील कोणतीही कार्यवाही करण्यात न आल्यामुळे आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास विजय देशमुख यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी करून अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी त्यांना वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, वैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण यांनी देशमुख यांची भेट घेऊन या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकांनी चौकशीचे आदेश दिले असून या प्रकरणी निश्चीत कारवाई होईल अशी ग्वाही दिली. तर विजय देशमुख यांनी मात्र संबंधीतांवर कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला. याप्रसंगी संभाजी सेनेचे अध्यक्ष लक्ष्मणबापू शिरसाठ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.