
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अपघातामुळे गुडघ्याला गंभीर दुखापत होऊन एसीएल (अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट) आणि पीसीएल (पोस्टेरियर क्रुशिएट लिगामेंट) ही गुडघ्याची दोन्ही महत्त्वाची लिगामेंट फाटलेल्या २७ वर्षीय तरुणीवर महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, जळगाव येथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. अस्थिरोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने आर्थ्रोस्कोपी पद्धतीने गुंतागुंतीची एसीएल आणि पीसीएल रिकन्स्ट्रक्शन शस्त्रक्रिया पूर्ण केली. शस्त्रक्रियेनंतर तरुणीची प्रकृती स्थिर असून, तिच्या गुडघ्याची हालचाल आणि स्नायूंची ताकद पूर्ववत करण्यासाठी पुढील उपचारांसह फिजिओथेरपी सुरू करण्यात आली आहे.

संबंधित तरुणीचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात तिच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. गुडघ्यात तीव्र वेदना जाणवत होत्या, तसेच पायाची हालचाल करताना आणि चालताना अडचणी निर्माण होत होत्या. सुरुवातीला दुखापत सामान्य स्वरूपाची असावी असे वाटत असले, तरी वेदना आणि हालचालींमधील अडथळे कायम राहिल्याने तिने वैद्यकीय उपचार घेण्याचा निर्णय घेतला. महादेव रुग्णालयातील अस्थिरोग विभागाचे डॉ. नरेंद्र शिरसाठ आणि डॉ. मनीष चौधरी यांनी तरुणीची तपासणी करून एमआरआय करण्याचा सल्ला दिला. एमआरआय तपासणीच्या अहवालातून गुडघ्याला स्थिरता देणाऱ्या एसीएल आणि पीसीएल या दोन्ही महत्त्वाच्या लिगामेंटला गंभीर दुखापत होऊन त्या फाटल्याचे निदान झाले. या दोन्ही लिगामेंटच्या दुखापतीमुळे गुडघ्याच्या स्थिरतेवर परिणाम होत असल्याने शस्त्रक्रियेद्वारे उपचार करणे आवश्यक होते.
रुग्णाची दुखापत आणि वैद्यकीय स्थिती लक्षात घेऊन अस्थिरोग विभागातील तज्ज्ञांनी आर्थ्रोस्कोपी पद्धतीने एसीएल आणि पीसीएल रिकन्स्ट्रक्शन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या आधुनिक शस्त्रक्रिया पद्धतीमध्ये मोठा छेद न घेता छोट्या छिद्रांमधून कॅमेरा आणि विशेष शस्त्रक्रिया उपकरणांच्या साहाय्याने गुडघ्याच्या आतील भागाची तपासणी व उपचार केले जातात. कॅमेराच्या माध्यमातून गुडघ्याच्या आतील संरचनांचे निरीक्षण करून खराब झालेल्या लिगामेंटची पुनर्रचना करण्यात येते. या पद्धतीमुळे शस्त्रक्रिया अचूकपणे करण्यास मदत होते. महादेव रुग्णालयातील अस्थिरोग विभागाचे डॉ. नरेंद्र शिरसाठ, डॉ. मनीष चौधरी, डॉ. विरेंद्र पाटील, डॉ. नचिकेत झगडे आणि डॉ. देवेंद्र पाटील यांच्या वैद्यकीय पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. शस्त्रक्रियेसाठी भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. रघुनाथ बर्हाटे, डॉ. विदीशा आणि डॉ. सुश्रिता यांनी सहकार्य केले.
शस्त्रक्रियेनंतर तरुणीची प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. गुडघ्याची हालचाल पूर्ववत होण्यासाठी, स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी आणि दैनंदिन हालचाली सुरळीत होण्यासाठी फिजिओथेरपी सुरू करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर पुनर्वसन प्रक्रियेला महत्त्व असून, डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार व्यायाम आणि उपचार घेणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले. अपघात किंवा खेळताना झालेल्या दुखापतीमुळे एसीएल आणि पीसीएल लिगामेंट फाटल्यास गुडघा अस्थिर होणे, चालताना त्रास जाणवणे आणि दैनंदिन हालचालींवर मर्यादा येणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. अशा दुखापतींकडे दुर्लक्ष न करता वेळेवर तज्ज्ञांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. एमआरआय तपासणीमुळे दुखापतीचे नेमके स्वरूप समजण्यास मदत होते. योग्य रुग्णांमध्ये आर्थ्रोस्कोपीद्वारे लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन केल्यास गुडघ्याची स्थिरता सुधारण्यास मदत होते. मात्र, शस्त्रक्रियेनंतर नियमित फिजिओथेरपी आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे डॉ. विरेंद्र पाटील यांनी सांगितले.



