
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय लष्कराचे माजी सरसेनापती जनरल अरुण कुमार वैद्य यांच्या स्मृतींना अभिवादन करत जळगाव शहरातील आकाशवाणी चौकाला (जनरल अरुण कुमार वैद्य चौक) देशभक्तीचे प्रेरणास्थळ बनविण्याच्या संकल्पाला नवी दिशा मिळाली. चौकाच्या सुशोभीकरणानंतर नामफलक अनावरण, वृक्षारोपण आणि शौर्यगाथा वाचनाचा कार्यक्रम माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी आणि सैनिकी परिवारातील सदस्यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण व राष्ट्रभक्तीमय वातावरणात पार पडला. या उपक्रमामुळे चौकाला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि देशभक्तिपूर्ण स्वरूप देण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.

कार्यक्रमासाठी संपूर्ण चौक तिरंग्यांनी सजविण्यात आला होता. राष्ट्रध्वजाच्या साक्षीने निवृत्त सैन्यदलातील अधिकारी, वीरमाता आणि वीरपत्नी यांच्या शुभहस्ते जनरल अरुण कुमार वैद्य यांच्या नावाच्या नवीन नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांच्या हस्ते चौक परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. देशाच्या संरक्षणासाठी समर्पित असलेल्या सैनिकांच्या शौर्याला अभिवादन करणाऱ्या या सोहळ्याला विशेष भावनिक महत्त्व प्राप्त झाले.
यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी जनरल अरुण कुमार वैद्य यांच्या सैनिकी कारकिर्दीचा, नेतृत्वाचा, अतुलनीय शौर्याचा आणि देशासाठी केलेल्या योगदानाचा प्रेरणादायी इतिहास उपस्थितांसमोर मांडला. त्यांच्या शौर्यगाथेच्या वाचनातून उपस्थितांना भारतीय सैन्यदलातील पराक्रम, शिस्त, त्याग आणि राष्ट्रसेवेच्या मूल्यांची आठवण करून देण्यात आली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
या प्रसंगी उपस्थित वीरमाता, वीरपत्नी आणि माजी सैनिकांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. देशाच्या रक्षणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्याचा हा क्षण उपस्थितांसाठी अभिमानास्पद आणि भावनिक ठरला. सैनिकांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच त्यांच्या त्यागाची समाजाला जाणीव करून देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १४ जून २०२६ पासून मनसेतर्फे स्वखर्चाने या चौकाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. चौक परिसरात आतापर्यंत सुमारे २०० फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे. तसेच, जवळपास तीस वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत असलेल्या चौकातील दोन ऐतिहासिक तोफांची रंगरंगोटी करून त्यांची पुनर्स्थापना करण्यात आली. या कामांमुळे चौकाला अधिक आकर्षक आणि ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले असून, परिसराच्या सौंदर्यातही भर पडली आहे. चौकाचे महत्त्व आणखी वाढविण्यासाठी भारतीय सैन्यदलातील सेवामुक्त रणगाडा येथे उभारण्याचा मनसेचा मानस आहे. यासाठी संरक्षणमंत्र्यांना पत्र पाठवून सेवामुक्त रणगाडा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. लोकसहभागातून चौकात रणगाडा उभारण्याचे नियोजन असून, त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी यावेळी सांगितले की, जळगाव शहरात भारतीय सैन्यदलाच्या शौर्याची, पराक्रमाची आणि बलिदानाची आठवण करून देणारा हा महत्त्वपूर्ण चौक व्हावा, ही त्यांच्या उपक्रमामागील भूमिका आहे. शहरातून ये-जा करणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत व्हावी, विद्यार्थ्यांना भारतीय सैन्यदलाचा इतिहास आणि सैनिकांचे योगदान समजावे, तसेच नव्या पिढीला राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने चौकाच्या विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. हा केवळ सुशोभीकरणाचा उपक्रम नसून देशासाठी लढणाऱ्या वीरांच्या शौर्याला अभिवादन करणारे प्रेरणास्थळ उभारण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आजच्या पिढीला देशाचा लष्करी इतिहास, सैनिकांचे शौर्य, त्याग आणि बलिदान यांची ओळख करून देणे आवश्यक आहे. जनरल अरुण कुमार वैद्य चौकात ऐतिहासिक तोफा, भविष्यात रणगाडा आणि देशभक्तिपूर्ण वातावरण निर्माण करण्यामागे हाच व्यापक विचार असल्याचे आयोजकांनी सांगितले. शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या चौकाला भेट देऊन देशाच्या संरक्षणासाठी योगदान देणाऱ्या वीरांचा इतिहास जाणून घ्यावा, त्यातून राष्ट्रप्रेम, शिस्त आणि देशाप्रती कर्तव्यभावना विकसित व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमाला खानदेश रक्षक फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष विजय सपकाळे, उपाध्यक्ष रफिक शेख, रत्नाकर चौधरी, प्रशांत विसपुते, वीरपत्नी फरीदाबी उस्मान शेख, वीरपत्नी भारती जितेंद्र कोल्हे, वीरपत्नी अर्चना नरेंद्र महाजन, श्रीमती कल्पना कोळी यांच्यासह सैनिकी परिवारातील सदस्य उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, चेतन पवार, ललित शर्मा, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, कुंदन पाटील, राहुल पाटील, मिथुन चव्हाण, हर्षल गावंडे, भावेश सूर्यवंशी, कीर्तीवर्धन पाटील, खुशाल ठाकूर यांच्यासह जळगाव शहरातील मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकारी उपस्थित होते.



