
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सुधर्मा संस्थेच्या वतीने पुनगाव येथील श्री विठ्ठल मंदिरात श्रीमद्भगवद्गीता अभ्यास बैठकीचे आयोजन करण्यात आले. गीतेतील विचार, अध्यात्मिक ज्ञान आणि जीवनमूल्यांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित या बैठकीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत विविध गावांमध्ये ५० गीता अभ्यास बैठका यशस्वीरीत्या पार पडल्या असून, पुनगाव येथील बैठकीतही गीतेच्या शिकवणीचे सखोल विवेचन करण्यात आले.

बैठकीच्या प्रारंभी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर श्रीमद्भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायातील ‘ज्ञानविज्ञान योग’ या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. गीतेतील विचारांचा दैनंदिन जीवनाशी संबंध जोडत कर्माचे स्वरूप, कर्माचे महत्त्व, परमेश्वरावरील भक्तीचे फलित आणि अनन्य भक्ती कशी करावी, याबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली.
गीतेतील ज्ञान आणि अध्यात्मिक विचारांचा अंगीकार केल्याने जीवनाला योग्य दिशा मिळू शकते, यावर यावेळी भर देण्यात आला. कलियुगात नामस्मरण आणि ईश्वरभक्तीचे महत्त्व विशद करत भक्तीमार्गाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच उपस्थितांना जडभरताची बोधप्रद कथा सांगण्यात आली. या कथेतून आसक्ती, आत्मज्ञान आणि आध्यात्मिक चिंतनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या प्रसंगी विष्णू बाविस्कर आणि हरी बाविस्कर यांना सुधर्मा संस्थेच्या वतीने श्रीमद्भगवद्गीता ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे, गीतेचे उत्तम वाचन केल्याबद्दल इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या तुषार सुनील बाविस्कर या विद्यार्थ्यालाही गीता ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात आले. लहान वयात धार्मिक ग्रंथांचे वाचन आणि अभ्यास करण्याच्या त्याच्या आवडीचे उपस्थितांनी कौतुक केले.
बैठकीदरम्यान उपस्थित ग्रामस्थांनी अशा प्रकारचा गीता अभ्यास प्रथमच अनुभवत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. गीतेतील विचार समजून घेण्याची आणि त्यांचे जीवनात आचरण करण्याची संधी अशा बैठकांमुळे मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीचे सूत्रसंचालन सुधर्मा संस्थेचे अध्यक्ष हेमंत बेलसरे यांनी केले, तर संस्थेचे सदस्य नानाभाऊ चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुनगावचे सरपंच किशोर बाविस्कर यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



