
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला जळगाव शहरात अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने कामगार सेलच्या जळगाव शहर जिल्हाध्यक्षपदी विशाल राजेंद्र देशमुख यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कामगार सेलचे अध्यक्ष शिवाजी रा. खटकाळे यांनी मुंबई येथे नियुक्तीपत्र प्रदान करून देशमुख यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे शहरातील कामगार सेलच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विशाल राजेंद्र देशमुख यांची पक्षाप्रती असलेली निष्ठा, संघटनात्मक कौशल्य तसेच कामगार चळवळीतील सक्रिय योगदान लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांची जळगाव शहर जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. प्रदेश कामगार सेलचे अध्यक्ष शिवाजी रा. खटकाळे यांनी नियुक्तीपत्र देताना आगामी काळात जळगाव शहरात कामगार सेलच्या माध्यमातून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी देशमुख प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास व्यक्त केला.
शरदचंद्र पवार यांच्या पुरोगामी विचारांचा प्रसार, पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे तसेच असंघटित कामगार वर्गाच्या प्रश्नांना संघटनात्मक स्तरावर आवाज देणे, यासाठी विशाल देशमुख यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, अशी अपेक्षा नियुक्तीपत्राद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. कामगार क्षेत्रातील विविध समस्या, कामगारांचे हक्क आणि संघटनात्मक विस्तार यावर आगामी काळात कामगार सेलच्या माध्यमातून लक्ष केंद्रित करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. या नियुक्तीबद्दल विशाल देशमुख यांनी पक्षश्रेष्ठींचे तसेच शरदचंद्र पवार यांचे आभार मानले. कामगारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी, कामगारांना संघटित करण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची संघटना जळगाव शहरात घराघरांत पोहोचवण्यासाठी आपण तत्परतेने कार्य करू, असा संकल्प त्यांनी व्यक्त केला.



