
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आजच्या धावपळीच्या जीवनात पालक आणि मुलांमधील संवाद अधिक दृढ व्हावा, तसेच आई-वडिलांच्या कष्टांची, प्रेमाची आणि त्यागाची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशाने कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये एक हृदयस्पर्शी उपक्रम राबविण्यात आला. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आई-बाबांना कृतज्ञतेची पत्रे लिहून मनातील भावना व्यक्त केल्या. पत्र लिहिताना अनेक विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले आणि शाळेच्या प्रांगणात संस्कार, प्रेम व कृतज्ञतेचा भावनिक संवाद रंगला.

शाळेच्या मैदानावर आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांनी आजवर घेतलेले कष्ट, त्यांच्याकडून मिळालेले प्रेम, त्याग आणि दिलेले संस्कार यांची आठवण जागवली. रोजच्या जीवनात अनेकदा व्यक्त न होणाऱ्या भावना विद्यार्थ्यांनी पत्रांच्या माध्यमातून मांडल्या. आई-बाबांनी आपल्यासाठी केलेल्या त्यागाबद्दल आभार व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी त्यांच्या योगदानाची जाणीव शब्दांतून व्यक्त केली. मनापासून लिहिलेल्या या पत्रांमुळे उपक्रमाला भावनिक स्वरूप प्राप्त झाले.
या उपक्रमात रितेश पवार, ओम पगारे, प्रणव जाधव, रितेश मराठे, प्रतिम जाधव, मोहित ठाकरे, आशिष राठोड, विशाल चव्हाण, सतीश राठोड, कृष्णा वारुळे, हर्षल राणे, यश राठोड, भूमेक भंगाळे आणि कृष्णा ठाकरे या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. पत्र लिहिताना काही विद्यार्थ्यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. आई-वडिलांच्या प्रेमाची आणि त्यांच्यासाठी घेतलेल्या कष्टांची जाणीव व्यक्त करताना विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले. शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका संगीता पाटील यांनी या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. आजच्या धावपळीच्या युगात पालक आणि मुलांमधील संवाद अधिक दृढ होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये आई-बाबांप्रती आदर, प्रेम आणि कृतज्ञतेची भावना निर्माण व्हावी, तसेच पालकांनी केलेल्या त्यागाची जाणीव त्यांना व्हावी, या हेतूने ‘आई-बाबांना पत्राद्वारे भावनिक साद’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना शाळेचे आदर्श शिक्षक किरण विठ्ठल पाटील यांनी मार्गदर्शन केले. पत्रलेखनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वतःच्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली. केवळ शैक्षणिक ज्ञान नव्हे, तर जीवनमूल्ये आणि नात्यांमधील जिव्हाळा जपण्याचे संस्कारही शिक्षणातून रुजले पाहिजेत, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. शाळेचे उपमुख्याध्यापक जे. एस. चौधरी, पर्यवेक्षक के. आर. पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांप्रती व्यक्त केलेल्या भावना पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.



