Home क्राईम रामानंदनगर पोलिसांची मोठी कामगिरी ; घरफोडीचा गुन्हा उघड, रेल्वेस्थानकावरून संशयिताला अटक

रामानंदनगर पोलिसांची मोठी कामगिरी ; घरफोडीचा गुन्हा उघड, रेल्वेस्थानकावरून संशयिताला अटक

0
1


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शामनगर परिसरात झालेल्या घरफोडीचा गुन्हा रामानंदनगर पोलिसांनी तपासाच्या आधारे उघडकीस आणला आहे. कुटुंबीयांसह देवदर्शनासाठी बाहेर गेलेल्या नागरिकाच्या घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने, टीव्ही आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज चोरी करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी शक्तीसिंग उर्फ हग्गु जीवनसिंग जुन्नी याला जळगाव रेल्वेस्थानकावरून ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, गुन्ह्यात सहभागी असल्याचे सांगितले जाणारे अन्य दोन साथीदार अद्याप फरार आहेत.

रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शामनगर परिसरात राहणारे किरण नंदकिशोर वासेवाय हे १२ नोव्हेंबर २०२६ रोजी संपूर्ण कुटुंबासह पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. १५ नोव्हेंबर रोजी ते घरी परतले असता घराच्या दरवाजाचा कुलूप-कोंडा तोडलेला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात जाऊन पाहणी केली असता कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने, ४३ इंची टीव्ही आणि १२ हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरीस गेलेल्या मालमत्तेची एकूण किंमत १ लाख ११ हजार रुपये असल्याने त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी गुन्हे शोधपथकाला हा घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तपास पथकाने तांत्रिक बाबींचे विश्लेषण करून संशयितांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान राजीव गांधी नगर परिसरातील रहिवासी शक्तीसिंग उर्फ हग्गु जीवनसिंग जुन्नी आणि त्याचे अन्य दोन साथीदार या गुन्ह्यात सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, शक्तीसिंग हा घरी मिळून येत नसल्याने त्याचा शोध सुरू ठेवण्यात आला.

१९ नोव्हेंबर २०२६ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वारुंगसे यांना शक्तीसिंग हा जळगाव रेल्वेस्थानकावरून बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच गुन्हे शोधपथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे आणि त्यांच्या पथकाने तातडीने रेल्वेस्थानक गाठले. तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या शक्तीसिंगला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलीस कोठडीतील चौकशीदरम्यान शक्तीसिंग याने हा गुन्हा सुबेरसिंग राजुसिंग टाक आणि शेरुसिंग सोजीतसिंग भोंड (दोघेही रा. आत्महत्या कॉलनी, जळगाव) यांच्या साथीने केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याची पोलीस कोठडी रिमांड घेऊन चोरीच्या मुद्देमालाचा शोध घेतला. या कारवाईत चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

हस्तगत केलेल्या मुद्देमालात ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, १ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप, १ ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील फुली, ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, २ भार वजनाचा चांदीचा गोफ, १ भार वजनाचे चांदीचे ब्रेसलेट, ५ भार वजनाच्या चांदीच्या तोरड्या, चांदीचे देव, चांदीचे कडे, फुलपात्र तसेच सॅमसंग कंपनीचा ४३ इंची टीव्ही यांचा समावेश आहे. या मुद्देमालाच्या हस्तगतामुळे फिर्यादीला दिलासा मिळाला आहे. या गुन्ह्यातील सुबेरसिंग राजुसिंग टाक आणि शेरुसिंग सोजीतसिंग भोंड हे दोघे फरार असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. उर्वरित संशयितांना लवकरच ताब्यात घेण्यासाठी तपास यंत्रणा प्रयत्नशील आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वारुंगसे, गुन्हे शोधपथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोलीस उपनिरीक्षक संजय तडवी, पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत, पोलीस नाईक योगेश बारी, तसेच पोलीस कर्मचारी सुमेध इंधाटे, मुकुंद गवते, मनोज मराठे, सागर नन्नवरे, जुलालसिंग परदेशी आणि मोतीलाल चौधरी यांनी सहभाग घेतला.


Protected Content

Play sound