Home धर्म-समाज अनाथ मुले आणि वृद्धांच्या सहवासात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांचा वाढदिवस साजरा

अनाथ मुले आणि वृद्धांच्या सहवासात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांचा वाढदिवस साजरा

0
1


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणताही औपचारिक कार्यक्रम किंवा हार-तुरे स्वीकारण्याऐवजी अनाथ मुले आणि वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत वेळ घालवत आपला वाढदिवस साजरा केला. मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ रोजी गुरुनानक जयंतीच्या सुट्टीचे औचित्य साधत त्यांनी चोपडा तालुक्यातील वेले येथील अमर संस्था संचलित अनाथ आश्रम, वृद्धाश्रम आणि प्रभू आश्रमाला भेट देत गरजूंना मदतीचा हात दिला.
या भेटीदरम्यान तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी वृद्धाश्रमातील १३ आजी-आजोबांना थंडीपासून संरक्षण मिळावे यासाठी स्वेटर आणि कानटोपीचे वाटप केले, तसेच आश्रमातील मुलांना व वृद्धांना फळांचे वाटप केले. हार-गुच्छ अथवा सत्कार समारंभ टाळून आपल्या कमाईतील खारीचा वाटा सामाजिक उपक्रमासाठी देण्याचा निर्णय घेत त्यांनी अनाथ मुलांसोबत केक कापून वाढदिवसाचा आनंद साजरा केला.
दिवसभर आश्रमात थांबून त्यांनी संपूर्ण संस्थेची पाहणी केली आणि गरजू घटकांसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी शेषराव पाटील यांनी संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध सेवाकार्यांची माहिती तहसीलदारांना दिली. विशेष म्हणजे, हे सर्व सेवाकार्य विनाअनुदानित तत्त्वावर सुरू असल्याचे या भेटीत अधोरेखित करण्यात आले.
संस्थेचे कामकाज पाहिल्यानंतर तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी अमर संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब चंद्रकांत गुलाबराव पाटील (कोसगावकर) आणि त्यांच्या विश्वस्त सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले. अनाथ मुले आणि वृद्धांचे संगोपन करण्यासोबतच मानसिकदृष्ट्या दुर्बल किंवा निराधार ‘प्रभू’ नागरिकांसाठी स्वतंत्र आश्रम उभारून त्यांच्यावर उपचार करणे आणि पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे गावी पाठवण्याचा संस्थेचा उपक्रम अत्यंत माणुसकीचा आणि कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी यावल तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या अव्वल कारकून वैशाली पाटील या देखील उपस्थित होत्या. संस्थेच्या वतीने तहसीलदार मोहनमाला नाझीरकर आणि वैशाली पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

Protected Content

Play sound