

वरणगाव, ता. भुसावळ- दत्तात्रय गुरव । एकीकडे दुष्काळसदृश परिस्थितीमुळे नागरिकांना पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याचे आवाहन केले जात आहे, शहरातील पाणीपुरवठ्याचे अंतर वाढविण्याची वेळ आली आहे; तर दुसरीकडे वरणगाव परिसरात तब्बल ४५० ते ५०० विटभट्ट्या सुरू करण्याची जय्यत तयारी सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विटनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असताना या भट्ट्यांना परवानगी कशी दिली जात आहे? सर्वसामान्यांनी पाणी काटकसरीने वापरायचे आणि विटभट्ट्यांसाठी भूजलाचा उपसा सुरू राहणार का? असा संतप्त सवाल उपस्थित होत असून, महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव शहर आणि परिसरातील विविध शिवारांमध्ये विटभट्ट्या उभारण्याची लगबग सुरू झाली आहे. वरणगाव शहर शिवारात अंदाजे २०० ते २५०, सुसरी-पिंपळगाव शिवारात ५० ते ५५, जाडगाव रोड परिसरात सुमारे १००, जाडगाव शिवारातील हिरामारोती मंदिरासमोर १०, तळवेल शिवारात ३०, बोहार्डी शिवारात २०, तर टहाकळी शिवारात सुमारे १०० विटभट्ट्या उभारण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. काही ठिकाणी जागेची साफसफाई सुरू असून, तर काही ठिकाणी प्रत्यक्ष विटा थापण्याच्या कामालाही सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, सध्या वरणगाव शहरासह परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने शहरातील पाणीपुरवठ्याचे अंतर वाढविण्याची वेळ आली आहे. नागरिकांना पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन केले जात असताना दुसरीकडे विटनिर्मितीसाठी विहिरी आणि कूपनलिकांमधून मोठ्या प्रमाणात पाणी उपसले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भूजल पातळी आणखी खालावण्याचा धोका निर्माण झाला आहे. शासनाकडून पाणी उपशावर निर्बंध असताना विटभट्ट्यांसाठी पाण्याचा वापर नेमका कोणत्या नियमांनुसार आणि कोणत्या परवानगीने केला जाणार, याचे उत्तर प्रशासनाने देण्याची गरज आहे.
विटभट्ट्यांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याबरोबरच सुपीक मातीचाही वापर केला जातो. त्यामुळे भूजल पातळी घटण्यासोबतच जमिनीच्या सुपीकतेवर आणि पर्यावरणावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. आधीच पावसाअभावी शेतकरी संकटात असताना शेतीसाठी आवश्यक असलेले पाणी विटनिर्मितीसाठी वापरले गेल्यास त्याचा फटका शेती आणि पशुधनालाही बसू शकतो. त्यामुळे यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत विटभट्ट्यांच्या कामकाजावर कठोर नियंत्रण ठेवण्याची मागणी जोर धरत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही विटभट्टेधारकांकडून सुमारे दहा हजार रुपयांच्या आसपास दंडात्मक रक्कम स्वीकारून भट्ट्या सुरू ठेवण्याची मुभा दिली जात असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, दंड भरला म्हणजे पर्यावरणाचे नुकसान करण्याचा परवाना मिळतो का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. दुष्काळाच्या काळात केवळ दंड वसूल करून जबाबदारी संपवण्याऐवजी प्रत्यक्ष पाणी वापर, परवानग्या आणि पर्यावरणीय नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
यापूर्वीही शेतकऱ्यांच्या नावाखाली विटभट्टेधारकांनी तापी नदीतील मोठ्या प्रमाणातील गाळ वाहून नेल्याचे आरोप झाले होते. त्यामुळे यंदा विटभट्ट्यांसाठी लागणाऱ्या मातीची वाहतूक रॉयल्टी भरून केली जात आहे की विनारॉयल्टी, याचीही महसूल विभागाने तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. माती उत्खनन, वाहतूक परवाने आणि शासनाच्या महसुलाचा प्रश्नही यामुळे ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, महसूल विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विटभट्टेधारकांशी वैयक्तिक आर्थिक हितसंबंध असल्यामुळे त्यांना अभय दिले जात असल्याचा गंभीर आरोपही परिसरातून केला जात आहे. या आरोपांची कोणताही पूर्वग्रह न ठेवता निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात कोणत्या विटभट्ट्यांना परवानगी देण्यात आली आहे, किती ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत आहे आणि पाण्याचा उपसा कोणत्या स्रोतांमधून केला जात आहे, याची वस्तुस्थिती प्रशासनाने स्पष्ट करावी.
दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता महसूल प्रशासनाने यंदा केवळ दंडात्मक कारवाईवर भर न देता विटभट्ट्यांच्या परवानग्यांचा फेरविचार करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वरणगाव परिसरातील सर्व विटभट्ट्यांची प्रत्यक्ष पाहणी करून पाणी उपसा, माती उत्खनन, रॉयल्टी आणि पर्यावरणविषयक नियमांची तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एकीकडे सामान्य नागरिकांना पाण्याचा थेंब न् थेंब जपण्याचे आवाहन आणि दुसरीकडे शेकडो विटभट्ट्यांच्या माध्यमातून भूजल उपशाचा संभाव्य धोका, या विरोधाभासामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. दुष्काळात जनतेच्या पाण्याचे संरक्षण करणार की विटभट्ट्यांच्या तयारीकडे दुर्लक्ष करणार, याचे उत्तर आता महसूल प्रशासनाला द्यावे लागणार आहे.



