Home Cities जळगाव नशिराबादमध्ये दुर्गंधीचा कहर; नागरिकांचा संयम सुटला! ; दुर्गंधी रोखण्यासाठी कंपनी मालकाचे आश्वासन

नशिराबादमध्ये दुर्गंधीचा कहर; नागरिकांचा संयम सुटला! ; दुर्गंधी रोखण्यासाठी कंपनी मालकाचे आश्वासन

0
3

नशिराबाद – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  नशिराबाद परिसरात गेल्या काही दिवसांपासून संध्याकाळच्या वेळेत पसरत असलेल्या तीव्र दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नशिराबाद-सुनसगाव रोड परिसरातून येणारा हा दुर्गंध वाऱ्याच्या दिशेने संपूर्ण गावात पसरत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजेपासून तर नशिराबादच्या बहुतांश भागात, अगदी गावाच्या दुसऱ्या टोकावरील पेठ आणि वरची आळी परिसरातही दुर्गंधीचा तीव्र त्रास जाणवला.

दुर्गंधीच्या वाढत्या त्रासामुळे नागरिकांचा संयम सुटत असताना अनेकांनी गावाचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष योगेश पाटील आणि उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांच्याशी संपर्क साधला. नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद-सुनसगाव रोडवरील समृद्धी केमिकल या कंपनीतून हा दुर्गंध येत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर नगराध्यक्ष योगेश पाटील, उपनगराध्यक्ष पंकज महाजन, नगरसेवक लालचंद पाटील, बापू बोढरे, विनोद रंधे, मनोज पाटील, नशिराबाद पोलीस स्टेशन च्या सपोनि योगिता नारखेडे यांच्यासह काही नागरिकांनी सायंकाळी संबंधित कंपनीला भेट दिली. यावेळी कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या उत्तरांमुळे उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. काही कर्मचाऱ्यांनी कंपनी बंद असल्याचे सांगितले, तर काही कर्मचाऱ्यांनी आपण येथे पाच ते सहा महिन्यांपासून काम करत असून कंपनीत नेमके काय काम चालते किंवा ही कोणत्या प्रकारची कंपनी आहे, याची माहिती नसल्याचे सांगितल्याचे उपस्थितांकडून समजते. त्यामुळे कंपनीतील कामकाजाबाबत उपस्थितांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

दरम्यान, कंपनीचे मालक घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांशी चर्चा केली. कंपनीतून दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन दुर्गंधी रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर उपस्थित लोकप्रतिनिधी आणि नागरिक तेथून परतले. मात्र, हा प्रश्न केवळ नशिराबादपुरता मर्यादित नसून नशिराबाद-सुनसगाव तसेच जळगाव खुर्द परिसरातील नागरिकांनाही दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नागरिकांच्या तक्रारीची वाट न पाहता स्वतःहून या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित परिसराची पाहणी करावी, दुर्गंधीच्या स्रोताची तपासणी करावी आणि आवश्यक असल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कंपनीकडून देण्यात आलेल्या आश्वासनानंतर दुर्गंधीचा प्रश्न प्रत्यक्षात मार्गी लागतो का, की पुन्हा नागरिकांना त्याच त्रासाला सामोरे जावे लागते, याकडे आता नशिराबादकरांचे लक्ष लागले आहे.

 


Protected Content

Play sound