Home क्राईम नशिराबादमध्ये आसारी चोरी करणारी टोळी जेरबंद! चार आरोपी अटकेत ; १.२८ लाखांचा...

नशिराबादमध्ये आसारी चोरी करणारी टोळी जेरबंद! चार आरोपी अटकेत ; १.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
2

नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद शहरात बांधकामस्थळावरून आसारी चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. न्यू इंग्लिश स्कूलसमोरील जलकुंभाच्या बांधकामस्थळावरून बांधकामासाठी आणलेली आसारी चोरी केल्याप्रकरणी नशिराबाद पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ४०० किलो आसारी आणि चोरीचा माल वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेली मालवाहू रिक्षा असा एकूण १ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

नशिराबाद शहरातील न्यू इंग्लिश स्कूलसमोर जलकुंभाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर लोखंडी आसारी आणण्यात आली होती. मात्र, बांधकामस्थळावरून ही आसारी चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. विशेष म्हणजे, या चोरीप्रकरणी संबंधित ठेकेदार किंवा अन्य कोणाकडूनही पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. तरीही पोलिसांनी स्वतःहून माहिती संकलित करून तपासाची चक्रे फिरवली. गोपनीय माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी संशयितांचा शोध घेत सापळा रचला. त्यानुसार चार जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर पोलिसांनी संशयितांकडून चोरीची सुमारे ४०० किलो आसारी आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली मालवाहू रिक्षा हस्तगत केली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख २८ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गिरीश भागवत खैरनार (रा. कृष्ण मंदिराजवळ, नशिराबाद), पवन किशन कोल्हे (रा. नशिराबाद), तुषार दीपक चौधरी (रा. नशिराबाद) आणि सुमित चेतनसिंह महाजन (रा. नशिराबाद) यांचा समावेश आहे. चारही आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कालावधीत चोरीच्या घटनेबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. दरम्यान, या चोरीच्या घटनेमुळे जलकुंभाच्या बांधकामस्थळावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बांधकामासाठी लागणारे लोखंड, सिमेंट आणि अन्य साहित्य मोठ्या प्रमाणावर बांधकामस्थळी ठेवलेले असते. मात्र, अशा ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था किंवा सुरक्षारक्षक नसल्यास चोरीच्या घटनांना संधी मिळू शकते. त्यामुळे ठेकेदार आणि संबंधित यंत्रणेने बांधकाम साहित्याच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

या टोळीने यापूर्वीही अशा प्रकारे बांधकाम साहित्याची चोरी केली आहे का, तसेच या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. त्यामुळे तपासादरम्यान आणखी आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, गुणवंत देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, सागर बिडे, प्रवीण लोहार आणि गणेश गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल महाजन करीत आहेत.


Protected Content

Play sound