जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । किशोरवयातील मानसिक बदल, भावनिक अस्थिरता आणि व्यसनाधीनतेच्या समस्येने ग्रासलेल्या बर्हाणपूर येथील १६ वर्षीय मुलावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मानसोपचार विभागाने यशस्वी उपचार केले आहेत. चिडचिड, आक्रमक वर्तन तसेच मद्य आणि गांजाच्या व्यसनातून बाहेर पडत महिनाभराच्या नियमित उपचार व समुपदेशनानंतर या मुलामध्ये सकारात्मक बदल दिसून आले आहेत.
बर्हाणपूर येथील या मुलाच्या वागण्यात गेल्या काही काळापासून मोठे बदल जाणवत होते. लहानसहान गोष्टींवरून चिडचिड होणे, रागावर ताबा न राहणे, घरातील व्यक्तींशी आक्रमक वागणे आणि मारहाण करण्याचे प्रकार वाढले होते. यासोबतच त्याला मद्य आणि गांजाचे व्यसन लागल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली होती. या वर्तनाचा मुलाच्या वैयक्तिक आयुष्यासह घरातील वातावरणावरही परिणाम होत होता. अखेर कुटुंबीयांनी त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाच्या मानसोपचार विभागात दाखल केले.
रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांनी मुलाची सखोल तपासणी करून त्याच्या मानसिक स्थितीचे मूल्यांकन केले. त्याच्या वर्तनामागील कारणे, मानसिक लक्षणे आणि व्यसनाशी संबंधित पैलूंचा अभ्यास करून उपचारांची रूपरेषा निश्चित करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने औषधोपचारांसह नियमित समुपदेशनावर विशेष भर दिला.

महिनाभराच्या उपचार कालावधीत मुलाच्या मानसिक स्थितीचा सातत्याने आढावा घेण्यात आला. त्याच्याशी संवाद साधून त्याच्या मनातील भावना, विचार आणि समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. सोबतच कुटुंबीयांनाही मुलाच्या मानसिक अवस्थेची माहिती देऊन त्याच्याशी संयम व सकारात्मक दृष्टिकोनातून कसे वागावे, याबाबत मार्गदर्शन केले गेले. उपचार आणि समुपदेशनाच्या समन्वयातून मुलाच्या वर्तनात हळूहळू सकारात्मक बदल दिसून आले, चिडचिड व आक्रमकता कमी झाली आणि त्याने उपचारांना उत्तम प्रतिसाद दिला. या उपचारासाठी मानसोपचार विभागातील डॉ. हुमेद महाडिक व डॉ. हिमांशू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. फरीन सुरैय्या यांनी सहकार्य केले.
किशोरवयीन मुलांच्या वर्तनात अचानक बदल होणे, सतत चिडचिड, आक्रमकता, एकलकोंडेपणा किंवा व्यसनाची लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष न करता वेळीच मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे असल्याचे डॉ. फरीन सुरैय्या यांनी स्पष्ट केले. महिनाभराच्या उपचार व समुपदेशनानंतर बर्हाणपूरच्या १६ वर्षीय मुलाच्या वर्तनात व मानसिक आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली आहे.



